मुंबई : भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवरुन अनेकदा काही मतभेद किंवा नाराजीचा सूर आळवला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. काही पट्टीच्या खेळाडूंना संघातून वगळण्यात येण्याचा मुद्दा वारंवार उचलला गेला आहे, त्यातच आता आणखी एका विषयाला चालना मिळाली आहे. हा विषय आहे, अजिंक्य रहाणे या अतिशय संयमी खेळाडूला भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघातून वगळण्याचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघातील माजी खेळाडू आकाश चोप्रा यानं अतिशय लक्षवेधी आणि निवड समितीला तितकंच बोचेल असं वक्तव्य केलं आहे. युट्यूब चॅनलच्या माध्मातून काही प्रश्नांची उत्तरं देत असताना आकाशनं हे वक्तव्य केलं.


'संघात चौथ्या स्थानावर फलंजाती करणाऱ्या रहाणेची आकडेवारी समाधानकारक होती. मुख्य म्हणजे तुम्ही सातत्यानं चांगली कामगिरी करत आहात,  ९४ च्या सरासरी स्ट्राईक रेटनं धावा काढत आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला संघात संधी न मिळणं हे  अन्यायकारक आहे. अजिंक्यला अचानक  एकदिवसीय संघातून बाहेर काढण्यात आलं. आपण  ज्याप्रणाणं दुधात पडलेली माशी बाहेर काढतो त्याप्रमाणं त्याला वागवण्यात आलं त्यामुळं माझ्यामते अजिंक्यवर हा अन्यायच झाला आहे', असं आकाश म्हणाला.


अजिंक्यला संघाबाहेर ठेवणं ही बाब योग्य नसल्याचाच सूर आकाशनं आळवला. यावेळी त्यानं रहाणेच्या खेळाबद्दलची आकडेवारीही सादर केली. शिवाय २०१८ पर्यंतची त्याची कामगिरी पाहता येत्या काळात त्याला संघात स्थान मिळायला हवं, अशी अपेक्षाही व्यक्त केली. आकाशनं आळवलेला हा सूर पाहता नेटकरी आणि क्रीडाप्रेमींनीह यालाच सहमती दर्शवली. मुळात संयमी खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या रहाणेसारख्या खेळाडूला आता येत्या काळात संघात पुन्हा स्थान दिलं जातं का याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.