`मला माफ कर...`, अब्दुल रजाकने मागितली ऐश्वर्याची जाहीर माफी, टाळ्या वाजवणाऱ्या आफ्रिदी म्हणाला `मी त्याला...`
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रजाकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रजाकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे. एका कार्यक्रमात अब्दुल रजाकने वर्ल्डकपमधील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर टीका करताना थेट ऐश्वर्याचा उल्लेख करत उदाहरण दिलं होतं. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. शोएब अख्तर यानेही टीका करत एखाद्या महिलेचा असा अपमान करणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर अब्दुल रजाकने व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे.
अब्दुल रजाक नेमकं काय म्हणाला?
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. यावरुन एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघावर टीका केली. या कार्यक्रमात अब्दुल रजाकसह शाहिद आफ्रिदी, युनूस खान, मिसबाह उल हक, उमर गुल, सईद अजमल, शोएब मलिक आणि कामरान अकमल यांनी हजेरी लावली होती.
क्रिकेट नियामक मंडळाला विचारसरणीच बदलावी लागेल असं सांगताना रजाक म्हणाला की, "मी त्यांच्या (पीसीबी) हेतूंविषयी बोलतोय. मी पाकसाठी खेळत होतो तेव्हा मला ठाऊक होतं की माझ्या कर्णधाराची संघाप्रती असणारी ध्येयं प्रामाणिक होती. त्यातूनच मला आत्मविश्वास, धाडस मिळालं आणि अल्लाहच्या मेहेरबानीनं मी चांगलं प्रदर्शन केलं".
पुढे तो म्हणाला "आता तुम्ही असा विचार करताय की मी ऐश्वर्या रायशी लग्न करेन आणि त्यातून जन्मलेलं आमचं मूल सुसंस्कृत आणि प्रामाणिक असेल तर असं कधीच होणार नाही. थोडक्यात आधी स्वत: प्रामाणिक राहा तरच संघाचं प्रदर्शन समाधानकारक राहील".
रझाकनं हे उदाहरण देताच त्याच्या बाजुला असणाऱ्या आफ्रिदी आणि मिसबाहनं टाळ्या वाजवल्या आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. नेटकऱ्यांना पाकच्या खेळाडूंचा हा अंदाज रुचला नाही, ज्यामुळं आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
जाहीर माफी
अब्दुल रजाकने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावरुन टीका होऊ लागल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे. "आम्ही क्रिकेट प्रशिक्षण आणि हेतूबद्दल बोलत होतो. यावेळी माझी जीभ घसरली आणि चुकून ऐश्वर्याचं नाव घेतलं. मी स्वत: तिची माफी मागत आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला वेगळं उदाहरण द्यायचं होतं," असं अब्दुल रजाक म्हणाला आहे.
दरम्यान या कार्यक्रमात हजर शाहिद आफ्रीदीनेही नंतर एका कार्यक्रमात हे फार चुकीचं विधान होतं हे मान्य करताना आपण तेव्हा नीट ऐकलं नसल्याने सर्वांसोबत हसलो होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे.
शोएब अख्तरनेही केली होती टीका
अब्दुल रजाकच्या या विधानावर शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे. शोएब अख्तरने एक्सवर पोस्ट शेअर करत अब्दुल रजाकसह इतर खेळाडूंनाही सुनावलं आहे. "अब्दुल रजाकने केलेल्या चुकीच्या जोक/तुलनेचा मी निषेध करतो. कोणत्याही महिलेचा असा अपमान करता कामा नये. शेजारी बसलेल्यांनी हसण्यापेक्षा आणि टाळ्या वाजवण्यापेक्षा याविरोधात आवाज उठवायला हवा होता," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.