मुंबई : भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. माझे प्रशिक्षक हे माझे सगळ्यात मोठे शिक्षक होते. मला ते अजिबात आवडायचे नाहीत तरीही मी त्यांच्याबरोबर २० वर्ष राहिलो. माझे प्रशिक्षक नेहमी मला ज्या गोष्टी ऐकायला आवडत नाहीत त्याच सांगायचे. असं ट्विट अभिनव बिंद्रानं केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कुंबळेनं भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला कुंबळेनं कॅप्टन विराट कोहलीला जबाबदार धरलं आहे.  मी पुन्हा प्रशिक्षक व्हावं म्हणून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांच्या समितीनं मला सांगितलं. पण कॅप्टनला माझ्या कार्यपद्धतीबद्दल आणि प्रशिक्षक म्हणून कायम राहण्याबद्दल आक्षेप आहेत, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं, म्हणून मी राजीनामा दिला आहे, असं प्रसिद्धी पत्रक कुंबळेनं ट्विटरवर शेअर केलं आहे.


कॅप्टननं घेतलेल्या या भूमिकेमुळे मला आश्चर्य वाटलं कारण कॅप्टन आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेतल्या मर्यादेचा मी नेहमीच आदर केला आहे. बीसीसीआयकडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तरीही मी राजीनामा दिल्याचा निर्णय घेतल्याचं कुंबळे म्हणाला आहे.