मेघा कुचिक, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : संगीताच्या तालावर लयबद्ध हालचाली म्हणजे एरोबिक्स. पण यामध्ये खेळ म्हणून करिअरही करता येतं.  मुंबईच्या चैत्राली कर्वेनं नुकत्याच झालेल्या रशियन ओपन वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिदम, स्ट्रेचिंग आणि स्ट्रेन्थ एरोबिक्सचं उत्तम मिलाफ. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी संगीताच्या तालावर केला जाणारा हा एक व्यायाम प्रकार..... मात्र हा फक्त व्यायाम प्रकारच नाही, तर क्रीडा प्रकारही आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. भारतात या खेळाकडे खूप कमीजण व्यावसायिक क्रीडापटू म्हणून वळतात.


मुंबईची चैत्राली कर्वे ही त्यापैकीच एक. तिनं या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारली. रशियात नुकत्याच झालेल्या रशियन ओपन वर्ल्ड कपमध्ये चैत्राली कर्वेनं वैयक्तिक प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं तर सांघिक प्रकारातही गोल्ड मेडलवर नाव कोरलं.


रशिया, इटली, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, कझाकिस्थान आणि मलेशियाच्या दिग्गज स्पर्धकांवर मात करत तिनं हे मेडल पटकावलंय. सहावीत असल्यापासून चैत्रालीनं ऐरोबिक्स खेळायला सुरुवात केली.


सुरुवातीला एक वर्ष कसून सराव केल्यानंतर तिला राज्यपातळी आणि राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि तिनं त्याचं सोनं केलं. चैत्रालीनं आतापर्यंत जवळपास १० राष्ट्रीय विजेतेपदं मिळवलीयत. तर इंडो-भूतान चॅम्पियनशिपमध्येही गोल्ड मेडलवर नाव कोरलंय. अजय भांबरे आणि संजय पाटील यांच्या सहकार्याने नंदीनी कोळसे आणि शंकर कोळसे यांच्याकडे ती सराव करते.


चैत्राली सध्या भांडुपच्या रामानंद आर्या डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये अकरावीत शिकतेय. ती रोप मल्लखांबचीही राष्ट्रीय खेळाडू आहे. याशिवाय कथ्थकची पाचवी परीक्षाही तिनं दिलीय. ऐरोबिक्स हा क्रीडा प्रकार भारतात जास्त लोकप्रिय नाहीय. मात्र चैत्रालीसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडलची कमाई केल्यानं आता भारतातही ऐरोबिक्स खेळाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून किंवा क्रीडा प्रकार म्हणून पाहिलं जाईल आणि ऐरोबिक्सलाही प्रतिष्ठा लाभेल अशी आशा आहे.