प्रीतीच्या `पंजाब`कडून खेळतोय हा खेळाडू, मैदानात उतरताच केला रेकॉर्ड
आयपीएलच्या अकराव्या मोसमाबरोबरच रेकॉर्ड व्हायलाही सुरुवात झाली आहे.
मोहाली : आयपीएलच्या अकराव्या मोसमाबरोबरच रेकॉर्ड व्हायलाही सुरुवात झाली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या मॅचमध्येही एक रेकॉर्ड पाहायला मिळालं. या मॅचमध्ये पंजाबकडून अफगाणिस्तानचा मुजीब जादरान मैदानात उतरला. मुजीब जादरानचं वय १७ वर्ष ११ दिवस आहे. आयपीएलमध्ये एवढ्या लहान वयात खेळणारा मुजीब हा पहिला खेळाडू आहे. याआधी सरफराज खानच्या नावाववर हे रेकॉर्ड होतं. पंजाबनं मुजीबला ४ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
आयपीएलमध्ये लहान वयात पदार्पण करणारे खेळाडू
मुजीब जादरान- १७ वर्ष ११ दिवस- २०१८
सरफराज खान- १७ वर्ष १७७ दिवस- २०१५
प्रदीप सांगवान- १७ वर्ष १७९ दिवस- २००८
वॉशिंग्टन सुंदर - १७ वर्ष १९९ दिवस- २०१७
राहुल चहर- १७ वर्ष २४७ दिवस
ईशान किशन- १७ वर्ष २६८ दिवस
अंडर १९ वर्ल्ड कपही खेळला जादरान
नुकत्याच झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही जादरान खेळला होता. वर्ल्ड कपमध्ये जारदारननं २६.६६च्या सरासरीनं ६ विकेट घेतल्या. ३.५च्या इकोनॉमीनं जादराननं बॉलिंग केली. झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सगळ्यात लहान वयात ५ विकेट घेणारा मुजीब पहिला खेळाडू बनला.
वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये घेतली गेलची विकेट
मुजीब जादराननं वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये क्रिस गेलचे स्टम्प उडवून त्याला आऊट केलं होतं.
२१व्या शतकात जन्मलेला पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू
२१व्या शतकात जन्म होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला जादरान हा पहिला क्रिकेटपटू आहे. २८ मार्च २००१ला जन्म झालेला मुजीब १६ वर्ष २५२ दिवसांचा असताना पहिली वनडे खेळला. एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा मुजीब जादरान अफगाणिस्तानचा पहिला तर जगातला ९वा खेळाडू आहे. आयर्लंडविरुद्ध जादरान पहिली वनडे खेळला होता. पहिल्याच मॅचमध्ये जादराननं १० ओव्हरमध्ये २४ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या होत्या.