मुंबई : अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान याच्या वडिलांचं निधन झालं आहे. भावनिक ट्विट करून राशिद खाननं याची माहिती दिली. राशिद खान हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. वडिलांच्या निधनानंतरही तो बिग बॅश लीगमध्ये खेळणार आहे. वडिलांचा सन्मान म्हणून मॅच खेळत राहण्याचं राशिद खाननं ठरवलं आहे. वडिलांच्या निधनानंतर राशिद खाननं एक ट्विट केलं. ''आज मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खास माणसाला गमावलं आहे. वडिल नेहमी कठोर राहा, असं का सांगत होते, हे मला आज कळतंय. त्यांच्या नसण्याचं दु:ख सहन करण्याची हिंमत मला यावी, म्हणून ते असं म्हणाले असतील, असं ट्विट राशिद खाननं केलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० वर्षांच्या राशिद खानचे वडिल हाजी खलील यांचं पार्थिव खैबर ट्रायबल जिल्ह्यात दफन करण्यात आलं. राशिद खानचे वडिल अफगाणिस्तानचे शरणार्थी म्हणून बऱ्याच कालावधीपासून पाकिस्तानमध्ये राहत होते.


अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू असलेल्या राशिद खाननं लेग स्पिनर म्हणून क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. पण आता लेग स्पिनरबरोबरच राशिदची वाटचाल आता ऑलराऊंडर म्हणूनही होऊ लागली आहे. आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना राशिदनं त्याच्या लेग स्पिनबरोबरच बॅटिंगमध्येही चमक दाखवली. आयसीसीच्या टी-२० बॉलरच्या क्रमवारीत राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे.