मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झालेल्या आशिष नेहराने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एक नोव्हेंबरला आशिष नेहरा न्यूझीलंडविरुद्ध फिरोजशाह कोटला मैदानावर अखेरचा सामना खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३८ वर्षीय नेहरा एक नोव्हेंबरनंतर भारतीय जर्सीत दिसणार नाही. क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार नेहरा स्थानिक क्रिकेट आणि टी-२०मध्येही खेळणार नाहीये. तसेच तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळणार नाही. 


नेहराला आपल्या क्रिकेट कारकीर्दीदरम्यान अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले. क्रिकेट कारकिर्दीत त्याच्यावर १२ शस्त्रक्रिया झाल्या. 


निवृत्तीबाबतच्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, हा निर्णय माझा स्वत:चा आहे. दिल्लीत खेळवला जाणारा आंतरराष्ट्रीय सामना माझ्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. आपल्या घरच्या मैदानावर निवृत्ती घेण्यापेक्षा मोठी गोष्ट
नाही. 


नेहरा पुढे म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्येही खेळणार नाही. जर मी एखादा निर्णय घेतला तर त्यावर पुन्हा विचार करण्याचा प्रश्नच उरत नाही. जर मी निवृत्ती घेतोय तर आयपीएलमध्येही खेळणार नाही. 


नेहराने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरही क्रिकेट चाहत्यांच्या जबरदस्त कमेंट्स आल्यात. अनेकांनी तर नेहराला धन्यवाद म्हटलंय.