कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने आफ्रिदीवर आरोप केले आहेत. त्याने दावा केला आहे की, २०१० च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ५ वर्षाची बंदीची शिक्षा पूर्ण केल्यानंतरही शाहीद आफ्रिदीने २०१६ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये टीममध्ये घेतलं नाही. बटने म्हटलं की, '२०१५ मध्ये बंदी संपल्यानंतर भारतात झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या टीममध्ये वापसी झाली असती पण आफ्रिदीने त्याला विरोध केला.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बटने मंगळवारी म्हटलं की, ''मुख्य कोच वकार यूनिस आणि बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवरने मला एनसीएमध्ये बोलवलं आणि माझी फिटनेस पाहण्यासाठी मला नेटमध्ये घेऊन गेले. वकार भाईंनी मला विचारलं की पाकिस्तानसाठी पुन्हा खेळण्यासाठी मी मानसिकरित्या तयार आहेस का आणि मी हो म्हटलं.'' ३४ वर्षाच्या बटने पुढे म्हटलं की, 'पाकिस्तान टीममध्ये माझा वापसीचा मार्ग मोकळा होत होता पण तत्कालीन कर्णधार आफ्रिदीने त्याचा मार्ग रोखला. मला माहिती नाही त्याने असं का केलं. मी त्याच्यासोबत बोललो नाही. मला हे योग्य नाही वाटलं. पण वकार आणि फ्लॉवरने मला सांगितलं की, आफ्रिदीने तुला विरोध केला.'



टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब ठरली. त्यानंतर आफ्रिदी आणि वकारने राजीनामा दिला. टेस्टचा ओपनर बॅट्समन बटने म्हटलं की, 'कोणत्याही खेळाडूने बंदीनंतर वापसी करत असलेल्या खेळाडूच्या भविष्याचा निर्णय घेऊ नये.' बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर यांना ऑगस्ट २०१० मध्ये इंग्लंड दौऱ्यात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडले होते. त्यानंतर आफ्रिदीला कर्णधार बनवण्यात आलं होतं.