शारजाह : इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गननंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनंही ऑलिम्पिकसाठी टी-१० क्रिकेटचा आदर्श फॉरमॅट असल्याचं म्हणलं आहे. शाहिद आफ्रिदी युएईमध्ये सुरु असलेल्या टी-१० क्रिकेट लीगमधल्या पखतून्स टीमचा कर्णधार आहे. शाहिद आफ्रिदीची टीम पखतून्स फायनलमध्ये डॅरेन सॅमीच्या नॉर्थन वॉरियर्ससोबत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आफ्रिदीनं क्रिकइंफो या वेबसाईटला मुलाखत दिली. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर जगात क्रिकेटचा चांगला प्रचार होईल. ऑलिम्पिकसाठी टी-१० हा फॉरमॅट आदर्श आहे, असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीनं केलं.


याआधी इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गननंही टी-१० क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये सामील करून घेण्याचं समर्थन केलं होतं. टी-१० हा फॉरमॅट नव्या प्रेक्षकांना आकर्षित करू शकतो असं मॉर्गनला वाटतंय.


मागच्यावर्षी सुरु झालेली टी-१० सुपर लीग क्रिकेटमधला नवा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत दोन्ही टीममध्ये १०-१० ओव्हरची मॅच होते. ही मॅच फक्त दीड तास चालते. मागच्यावर्षी शारजाहमध्ये ६ टीममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी टी-१० लीगमध्ये ८ टीम सहभागी झाल्या आहेत. आयोजकांनी यावर्षी स्पर्धेत भाग घेतलेल्या टीमची फी ४,००,००० डॉलरऐवजी १.२ मिलियन डॉलर केली होती.


टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.