कॅप्टन हवा तर असा... कोहलीच्या `त्या` निर्णयानंतर रोहितचा व्हिडीओ व्हायरल
कोहलीच्या या निर्णयानंतर कर्णधारपदासाठी रोहीत शर्माचं नाव चर्चेत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या विश्वातील ज्या गोष्टीवर चर्चा सुरू होती अखेर ती खरी ठरलीये. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-20चं कर्णधारपद सोडण्याचा काल निर्णय घेतला. कोहलीच्या या निर्णयानंतर कर्णधारपदासाठी रोहीत शर्माचं नाव चर्चेत आहे. तर विराटच्या कालच्या पोस्टनंतर रोहीत शर्माचा एक जुना व्हीडियो व्हायरल होतोय.
एका टी-20 सामन्याचा हा व्हीडियो आहे. या व्हीडियोमध्ये सामना सुरु असून रोहीत शर्मा टीमच्या इतर खेळांडूसोबत मैदानावर उभा दिसतोय. यावेळी तो सर्व खेळांडूंना काहीतरी समजवून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यातील हा व्हीडियो आहे. हा व्हीडियो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कॅप्टन असा असला पाहिजे असा कमेंट्स केल्या आहेत.
मुख्य म्हणजे रोहित आणि कोहली यांच्यामध्ये भारतीय टीममध्ये विस्तवही जात नाही अशा अनेक चर्चा पहायला मिळतात. दरम्यान रोहितने आयपीएलचं आतापर्यंत पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे. जर आयपीएलच्या कामगिरीवर इंडिया टीमची निवड केली जाते तर मग रोहितकडे टी-20चं कर्णधारपद का नाही, असा प्रश्नही सातत्याने उपस्थित केला जात होता.
रोहीत आणि कोहलीची अनेकदा तुलना होताना दिसते. रोहीत हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करतो. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटचा चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे विराटने कर्णधारपद सोडल्यावर टी-20 टीमचं कर्णधारपद रोहितकडेच येणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे.