विराट कोहलीसमोर बीसीसीआय झुकलं, परदेश दौऱ्यात बायको-गर्लफ्रेंड सोबत असणार
भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न झालं.
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न झालं. लग्नानंतर अनुष्का शर्मा विराटसोबत भारतीय टीमच्या अनेक परदेश दौऱ्यांमध्ये असते. इंग्लंड दौऱ्यातही अनुष्का शर्मा भारतीय टीमसोबत दिसली होती. यानंतर वाद निर्माण झाला होता. विराट कोहलीनंही खेळाडूंच्या बायको आणि गर्लफ्रेंडना परदेश दौऱ्याला नेण्यासाठी बीसीसीआयकडे आग्रह धरला होता. बीसीसीआयनंही विराट कोहलीचं हे म्हणणं मान्य केलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार प्रशासकीय समितीनं खेळाडूंची पत्नी किंवा गर्लफ्रेंड आता दौऱ्याचे पहिले १० दिवस खेळाडूंसोबत असणार नाही, असं सांगितलं आहे. उरलेले दिवस पत्नी किंवा गर्लफ्रेंड खेळाडूंसोबत राहू शकतात. याआधीच्या नियमानुसार परदेश दौऱ्यात पत्नी किंवा गर्लफ्रेंडना खेळाडूंसोबत राहायला फक्त १५ दिवसांची परवानगी होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी २०१५ साली पत्नी किंवा गर्लफ्रेंड दौऱ्यावर असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंची कामगिरी खराब होत असल्याचा आक्षेप घेतला होता. त्यावेळी बीसीसीआयनं सदरलँड यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं होतं.
खेळाडूंची बाजू समजून घेण्यासाठी प्रशासकीय समितीनं विराट कोहली, रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसोबत चर्चा केली होती. ही बैठक वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी झाली होती.