Video : Ajinkya Rahane संतापला; स्वतःच्याच टीमच्या खेळाडूला धक्के मारत काढलं बाहेर
आज 25 सप्टेंबर हा सामन्याचा शेवटचा दिवस होता.
मुंबई : दुलीप ट्रॉफी 2022 च्या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाकडून खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालवर कर्णधार अजिंक्य रहाणे वाईट पद्धतीने बरसला. दक्षिण विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यातील दुलीप ट्रॉफीचा निर्णायक सामना कोईम्बतूरमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये वेस्टने 294 रन्सनी मोठा विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. आज 25 सप्टेंबर हा सामन्याचा शेवटचा दिवस होता.
दक्षिणेच्या पराभवावर अगदी सुरुवातीलाच शिक्कामोर्तब झालं. 529 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना हनुमा विहारीची टीम अवघ्या 234 रन्सवर गारद झाली. मात्र याआधी अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात एक घटना पाहायला मिळाली ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Ajinkya Rahane ने जयस्वालला फटकारलं
20 वर्षीय यशस्वी जैस्वालने पश्चिम विभागासाठी दुसऱ्या डावात 323 चेंडूत 265 रन्स केले आणि दक्षिण विभागासाठी 529 रन्सचं लक्ष्य ठेवण्यास मदत केली. रविवारी सलामीच्या सत्रात तो कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत गप्पा मारताना दिसले त्यानंतर ते थेट लाईव्ह सामन्यात रहाणेने त्याला बाहेर काढलं.
जयस्वाल सतत दक्षिण विभागाचा फलंदाज रवी तेजाच्या अवती भवती फिरत स्लेजिंग करत होता. यानंतर फलंदाजाने तक्रार केली आणि अंपायरच्या हस्तक्षेपानंतर यशस्वीला रहाणेकडून दोन इशारे मिळाले. पण त्याने सवय सुधारली नाही. त्यानंतर अजिंक्य रहाणे शांततेने यशस्वीजवळ गेला आणि त्याला मैदान सोडून जाण्यास सांगितलं. इतकंच नाही तर त्याने यशस्वीच्या जागी दुसरा खेळाडू न घेता केवळ 10 खेळाडूंसह खेळ सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान यावेळी जयस्वालने कॅप्टनचंही ऐकलं नाही आणि रवी तेजाशी वाद घालत राहिला. त्यामुळे रहाणेचा पारा थोडा चढला आणि त्याने जयस्वालचा हात खाली ढकलून त्याला किंचित मागे ढकलून मैदानाबाहेर पाठवले. रहाणेच्या या मोठ्या कृतीचं मात्र सगळेच कौतुक करतायत.