हा भेदभाव नाही तर आणखी काय! जे Ajinkya Rahane सोबत घडलं, ते Virat Kohli सोबत का नाही?
अशा परिस्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आठवण झाली आहे.
मुंबई : एजबॅस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. भारताची कमकुवत फलंदाजी हे या पराभवाचे प्रमुख कारण होतं. संघातील बहुतांश फलंदाजांना अनुभवाची कमतरता होती. अशा परिस्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आठवण झाली आहे.
अजिंक्य रहाणे खराब फॉर्म आणि हाताच्या दुखण्यामुळे भारतीय टेस्ट टीममधून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. याआधी अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
मात्र इंग्लंडमध्ये अय्यरच्या फलंदाजीमध्ये अनुभवाची कमतरता होती. त्याचवेळी शुभमन गिल आणि हनुमा विहारी यांनाही या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. अशावेळी चाहत्यांनी अजिंक्य रहाणे असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, असं म्हटलंय.
अशा परिस्थितीत टीमला अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूची आणि उत्तम कर्णधाराची गरज असल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे. हर्षित नावाच्या युजरने लिहिलंय की, "गेल्या काही मालिकांमध्ये भारताने तीन कसोटी कर्णधार गमावलेत. मग अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवत नाही. का? कारण तो फॉर्ममध्ये नाही. हे खेळाडूसुद्धा फॉर्ममध्ये नाहीत. पण तुम्ही त्याच्या कर्णधारपदाचा रेकॉर्ड पहा. कर्णधार म्हणून तो एकही सामना हरला नाही."
दरम्यान यावेळी एक चाहत्याने, जर तुम्ही पुजारा आणि रहाणेला ड्रॉप करता, तर विराट कोहलीला का नाही?, असा संतप्त सवाल केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, अजिंक्य रहाणे टीमबाहेर बसलाय, तर विराट कोहलीने देखील बसावं. चाहत्यांनी एकंदरीत कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता टीका करण्यास सुरुवात केली आहे.
अजिंक्य रहाणेने 2019-2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक रन्स केले होते. रहाणेने अनेकदा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया देशांमध्ये चांगली कामगिरी केलीये. यासोबतच अनेक प्रसंगी त्याने कठीण काळातही उत्कृष्ट कर्णधारपद केलंय.
कर्णधार म्हणून रहाणेने आजपर्यंत एकही कसोटी गमावलेली नाही. रहाणेने 6 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून यापैकी एकही सामना भारताने गमावलेला नाही. जेव्हा जगातील कोणत्याही क्रिकेट पंडिताला भारतीय संघाकडून अपेक्षा नव्हती. त्यानंतर रहाणेने आपल्या नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून दिली.