ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. या विजयाबरोबरच ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. १० वर्षानंतर भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच जिंकला आहे. तर १५ वर्षांपुर्वी याच मैदानात भारताचा विजय झाला होता. २००८ साली पर्थच्या मैदानात अनिल कुंबळेच्या नेतृत्वात आणि २००२ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं टेस्ट मॅच जिंकली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍडलेडमधली टेस्ट मॅच जिंकण्यासाठी चेतेश्वर पुजारानं महत्त्वाची भूमिका बजावली. पुजारानं पहिल्या इनिंगमध्ये १२३ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ७१ रनची खेळी केली. या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. भारताच्या या विजयासाठी पुजाराचं योगदान असलं तरी अजिंक्य रहाणेनंही महत्त्वाची खेळी केली. रहाणेनं दुसऱ्या इनिंगमध्ये ७० रन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३२३ रनचं आव्हान मिळालं.


परदेशातील विजयात अजिंक्यचं योगदान


२०१८ या वर्षात भारतानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच जिंकली आहे. एकाच वर्षात तिन्ही देशांमध्ये टेस्ट मॅच जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. या तिन्ही विजयांमध्ये अजिंक्य रहाणेचं भारताच्या विजयाचा सूत्रधार होता.


जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारताचा जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ६३ रननी विजय झाला होता. या मॅचमध्ये रहाणेनं ४८ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर ऑगस्ट महिन्यात भारतानं नॉटिंगहमची मॅच २०३ रननी जिंकली. या मॅचमध्ये रहाणेनं १३१ बॉलमध्ये ८१ रनची खेळी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पुजारा-रहाणेच्या पार्टनरशीपमुळे भारतानं ऑस्ट्रेलियाला ३२३ रनचं आव्हान दिलं.


अजिंक्य रहाणेनं भारतामध्ये पहिलं शतक करण्याआधी परदेशात त्यानं ५ शतकं आधीच केली होती. त्यामुळे रहाणेला परदेशातला टेस्ट स्पेशलिस्ट म्हणूनही ओळखलं जातं. यावर्षी रहाणेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नसली तरी त्यानं भारताच्या विजयांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे.