मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात असून टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला 305 रन्सचं लक्ष्य दिलं आहे. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. मात्र प्रत्येक खेळाडूने थोड्या रन्सने आपलं योगदान दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा दुसरा डाव फारच हळू सुरू असताना अजिंक्य रहाणेने ही साखळी तोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी रहाणेने वेगवान फलंदाजी सुरू केली. त्याने त्याच्या छोट्या खेळीत 3 फोर आणि 1 सिक्स लगावली. दरम्यान 23 चेंडूत 20 धावा करून रहाणे मार्को जॅन्सेनचा बळी ठरला. मात्र तरीही रहाणेच्या या खेळीचं कौतुक होतंय.


हवं असतं तर अजिंक्य रहाणे स्वत:साठी खेळू शकला असता. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या प्लेइंग इलेव्हन जागेबाबत प्रश्न उपस्थित होत होता. पण त्याने अशा कठीण काळातही स्वत:चा विचार न करता आपल्या टीमला प्राधान्य दिलं आणि वेगवान गतीने रन्स केले.


रहाणे आणि इतर खेळाडूंच्या मोलाच्या योगदानामुळे टीम इंडियाने 305 रन्सचं लक्ष्य दिलंय. अशा परिस्थितीत आता सर्व जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर आली असून सेंच्युरियनमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. मात्र पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज असून पाऊस खेळ करणार का हे पहावं लागेल.