मुंबई : आयपीएलच्या पुढच्या मोसमाला जरी आणखी बराच कालावधी बाकी असला तरी टीमच्या पुढच्या वर्षाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुढच्या मोसमात राजस्थानकडून खेळलेला अजिंक्य रहाणे दिल्लीच्या टीमकडून खेळू शकतो. मागच्या दोन मोसमांमध्ये रहाणेची आयपीएलमधली कामगिरी चमकदार झाली नव्हती. २०१८ साली स्टीव्ह स्मिथवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रहाणेला राजस्थानच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं. २०१९ च्या मोसमात सुरुवातीला रहाणेच राजस्थानचा कर्णधार होता, पण टीमने अर्ध्यातच पुन्हा स्मिथला कर्णधार केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान आणि दिल्लीच्या टीममध्ये रहाणेबाबत चर्चा सुरु आहे. सगळं योग्य दिशेने झालं तर रहाणे २०२०मध्ये दिल्लीकडून खेळू शकतो. 'दिल्ली कॅपिटल्सला रहाणे त्यांच्या टीममध्ये हवा आहे, पण हा करार पूर्णत्वाला येईल का? याबाबत आता बोलणं उचित नाही. अनेक गोष्टींना लक्षात घ्यावं लागेल, कारण रहाणे अनेक वर्षांपासून राजस्थानसोबत खेळतो आहे. रहाणे आणि राजस्थानची टीम अशी आता ओळखही झाली आहे,' असं सूत्राने सांगितलं.


दिल्लीने चेहरा बदलला


जर रहाणे दिल्लीच्या टीममध्ये गेला तर नवीन टीम तयार करायला दिल्लीला चांगली मदत मिळेल. मागच्या मोसमात दिल्लीने आपले ३ खेळाडू हैदराबादला दिले आणि त्यांच्याकडून शिखर धवनला टीममध्ये घेतलं. दिल्लीकडून खेळताना धवनने ५२१ रन केले. मागच्या मोसमात २०१२ नंतर पहिल्यांदाच दिल्लीची टीम प्ले ऑफमध्ये पोहोचली. २०१९ मोसमाआधी दिल्लीच्या टीमने त्यांचं नावही बदललं. आधी दिल्ली डेयरडेव्हिल्स असलेली टीम या मोसमाच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स झाली. 


या मोसमासाठी दिल्लीने वेस्ट इंडिजच्या शेरफेन रुदरफोर्डला मुंबईच्या टीमला दिलं. रुदरफोर्डच्या बदल्यात दिल्लीला मुंबईचा लेग स्पिनर मयंक मार्कंडे मिळाला. 


२००८ आणि २००९ च्या मोसमात रहाणे राजस्थानकडून खेळला. २०१० साली रहाणे खेळला नाही यानंतर २०११ साली तो राजस्थानशी जोडला गेला. मध्ये दोन वर्ष राजस्थानच्या टीमवर बंदीची कारवाई करण्यात आली होती, तेव्हा रहाणे पुण्याकडून खेळला. ही बंदी उठल्यानंतर रहाणे पुन्हा राजस्थानच्या टीमकडून खेळला.