Ajinkya Rahane | ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय माझ्या नेतृत्वात, मात्र श्रेय दुसऱ्याला, रहाणे संतापला
अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) स्वत:च्या नेतृत्वात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
मुंबई : अजिंक्य रहाणे (Ajikya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांना टीम इंडिया (Team India) कसोटी संघातून वगळण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. यामध्येच रहाणेने एक असं वक्तव्य केलंय की ज्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. रहाणेने केलेल्या या विधानातून त्याचा रोख विराट कोहलीकडे असल्याचं म्हटलं जात आहे. माझ्या यशाचं श्रेय हे नेहमीच दुसऱ्यालाच देण्यात आलं, असंही रहाणे म्हणाला. (ajinkya rahane said someone else always took the credit for his work)
रहाणेचा कोहलीकडे रोख?
टीम इंडिया 2020-21 या दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील एडिलेड सामन्यात टीम इंडियाने लाज घालवली होती. अवघ्या 36 धावांवर कांगारुंनी टीम इंडियाचा खुर्दा उडवला होता. मात्र यानंतर रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता.
रहाणे काय म्हणाला?
"या मालिकेत मी अनेक निर्णय घेतले. या निर्णयाचं श्रेय हे दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आलं", असं रहाणे म्हणाला. रहाणेने हा आरोप करत असताना त्याने कोणाचं नावं घेतलं नाही. मात्र रहाणेचा रोख हा विराटकडे असल्याचं म्हटलं जात आहे. कारण रहाणेच्या नेतृत्वात मालिका विजय मिळवूनही त्याचं श्रेय विराटला मिळालं होतं.
रहाणेची कमाल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला. त्यामुळे टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर होती.
पहिल्या टेस्टनंतर कर्णधार विराट मायदेशी परतला. त्यामुळे त्या मालिकेतील उर्वरित 3 सामन्यांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी रहाणेला देण्यात आली. एका बाजूला आधीच मालिकेत पिछाडीवर होती. त्यात खेळाडूंच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं होतं.
अशात रहाणेने युवा खेळाडूंची मोठ बांधली. पहिल्या सामन्यातील पराभव विसरुन दुसऱ्या सामन्यात धमाका केला. कर्णधार रहाणेने दुसऱ्या सामन्यात केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या सामन्याचा वचपा घेतला. मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
"मला माहितीये की मी तिथं काय मिळवलंय. मी काय केलंय हे मला सांगायची गरज नाही. श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करण्याची माझी सवय नाही. मात्र असे काही निर्णय होते की जे मी ड्रेसिंग रुम किंवा मैदानात घेतले. मात्र याचं श्रेय हे कोणा दुसऱ्यानेच घेतलं. आपण मालिका जिंकावं, हे आमच्यासाठी महत्तवपूर्ण होतं. तो आमच्यासाठी ऐतिहासिक विजय होता", असं रहाणे म्हणाला. तो बॅकस्टेज विथ बोरिया या कार्यक्रमात बोलत होता.
रहाणेचा रोख शास्त्रीकडे?
रहाणेने कोणाचं नाव घेतलं नसलं तरी, त्याचा रोख हा विराट किंवा माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीकडे असल्याचंही म्हटलं जात आहे. कारण ऐतिहासिक विजयानंतर रवी शास्त्रींचही कौतुक करण्यात आलं होतं. कारण तेव्हा टीम इंडियातील 10 पेक्षा अधिक खेळाडूंना दुखापतीने ग्रासलं होतं.
त्यानंतर अशा काही प्रतिक्रिया आल्या, ज्यात मी घेतलेले निर्णय हे त्यांनीच घेतले आहेत, असं म्हंटलं. मात्र हे निर्णय मी घेतले आहेत, हे मला माहित होतं. मी जे काही निर्णय घेतले होते ते माझे होते. मी कधी स्वत:बाबत फार बोलत नाही आणि कौतुकही करत नाही. मात्र मी तेव्हा तिथे काय केलं होतं, हे मला माहितीये", असंही रहाणेने स्पष्ट केलं.