मुंबई : जागतिक शेतकरी दिनानिमित्त भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यांबाबत भावनिक ट्विट केलं आहे. शेती ही माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. लहानपणीचा बराच काळ मी शेतातच घालवला. शेतात काम करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, ते मला माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कायम ऋणी राहा. शेतकरी त्यांचं आयुष्य देशासाठी खर्ची घालतात, असं ट्विट रहाणेने केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अजिंक्य रहाणेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही रहाणेने एका शेतकऱ्यासोबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला होता. 'एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत', असं ट्विट रहाणेने १२ मार्चला केलं होतं.



'आज आपल्याला ज्या फळ-भाज्या मिळत आहेत, त्या शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे. त्यांचं जे काही आपल्या आयुष्यात योगदान आहे, ते फार महत्त्वाचं आहे. शेतकरी शेतात मेहनत करतो म्हणून आपल्याला खायला मिळतं. यामुळे मी शेतकरी दादांना थँक्यू म्हणू इच्छितो, त्यांचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे आणि खूप मोठं आहे. घरी कधीही जेवायला बसाल तेव्हा यामागे शेतकऱ्याची मेहनत आहे, हे विसरू नका,' असं रहाणे या व्हिडिओमध्ये म्हणाला होता.