कोलकाता : इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया डे-नाईट टेस्टसाठी तयार होत आहे. २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात हा ऐतिहासिक सामना होणार आहे. भारतीय टीम पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे या सामन्यात गुलाबी बॉल वापरण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे उत्साही आहे. आतापासूनच अजिंक्य रहाणेने या टेस्ट मॅचची स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. अजिंक्यने ट्विटरवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये रहाणे झोपलेला दिसत आहे. ऐतिहासिक गुलाबी बॉलच्या टेस्ट मॅचची स्वप्न बघायला आतापासूनच सुरुवात केली आहे, असं कॅप्शन रहाणेने या फोटोला दिलं आहे.



मंगळवारी रहाणे आणि कर्णधार कोहली सगळ्यात आधी कोलकात्याला पोहोचले. यानंतर ईशांत शर्माही कोलकात्यात दाखल झाला. तर मोहम्मद शमी, उमेश यादव बुधवारी सकाळी आणि रोहित शर्मा बुधवारी दुपारी इकडे पोहोचणार आहेत.


इंदूर टेस्टमध्ये रहाणेने ८६ रनची खेळी केली होती. या मॅचमध्ये मयंक अग्रवालनंतर सर्वाधिक रन रहाणेनेच केले होते. रहाणेने मयंकसोबत १९० रनची पार्टनरशीप केली. मयंकने २४३ रनची खेळी केली होती.


टीम इंडिया २ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये १-०ने आघाडीवर आहे. टेस्ट चॅम्पियनशीप सुरु झाल्यानंतर टीम इंडियाने ६ टेस्ट मॅच खेळल्या आहेत आणि या सगळ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताकडे सर्वाधिक ३०० पॉईंट्स आहेत.