मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने निवड समितीमध्ये येण्यासाठी अर्ज भरला आहे. अजित आगरकरने आपण अर्ज केल्याचं स्पष्ट केलं आहे. टीम इंडियाच्या निवड समितीचा अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत अजित आगरकर आघाडीवर आहे. याआधी आगरकर स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या निवड समितीचा अध्यक्ष होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित आगरकरसोबतच भारताचा माजी फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद यानेही अर्ज भरला आहे. पण प्रसाद हा सध्या ज्युनियर टीमच्या निवड समितीचा अध्यक्ष आहे. प्रसादने अर्ज भरला असला तरी त्याच्याकडे आता बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर राहण्यासाठी दीड वर्षाचा कालावधीच उपलब्ध आहे.


२४ जानेवारी ही निवड समितीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. बीसीसीआयला आलेल्या अर्जांमध्ये अजित आगरकर हे नाव सगळ्यात मोठं आहे. २६ टेस्ट, १९१ वनडे आणि ३ टी-२० मॅच खेळलेल्या आगरकरने एकूण ३४९ आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.


भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याऱ्या खेळाडूंमध्ये आगरकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये आगरकरने २८८ विकेट घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळे (३३४ विकेट) आणि जवागल श्रीनाथ (३१५ विकेट) यांनी आगरकरपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.


'याआधी एल शिवरामाकृष्णन हे निवड समिती अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अजित आगरकरने या पदासाठी अर्ज केल्यामुळे स्पर्धा वाढली आहे,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.


निवड समितीमध्ये पश्चिम झोनकडून जतिन परांजपे यांचं आणखी एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे आगरकरच्या रुपात आणखी एका मुंबईच्या खेळाडूची निवड समितीमध्ये वर्णी लागते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आता झोनल पद्धत रद्द करण्यात आली आहे.


अजित आगरकर आणि शिवरामाकृष्णन यांच्याशिवाय नयन मोंगिया, चेतन शर्मा आणि राजेश चौहान यांनीही बीसीसीआयकडे अर्ज केले आहेत. बीसीसीआयकडून पहिले क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक होईल. ही समितीच निवड समिती आणि अध्यक्षाची घोषणा करेल. गौतम गंभीर, मदन लाल आणि सुलक्षणा नाईक या तिघांची क्रिकेट सल्लागार समितीमध्ये नेमणूक होण्याची शक्यता आहे.


सध्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (दक्षिण झोन), गगन खोडा (मध्य झोन) यांचा कार्यकाळ संपत आहे. या दोघांच्या बदली सदस्यांची निवड क्रिकेट सल्लागार समिती करेल. सरनदीप सिंग (उत्तर झोन), देवांग गांधी (पूर्व झोन) आणि जतीन परांजपे (पश्चिम झोन) यांचा ४ वर्षांपैकी १ वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे.


निवड समितीसाठी या खेळाडूंचा अर्ज


अजित आगरकर (मुंबई)


व्यंकटेश प्रसाद (कर्नाटक)


चेतन शर्मा (हरियाणा)


नयन मोंगिया (बडोदा)


एल शिवरामाकृष्णन (तामीळनाडू)


राजेश चौहान (मध्य प्रदेश)


अमेय खुरासिया (मध्य प्रदेश)


ज्ञानेंद्र पांडे (उत्तर प्रदेश, ज्युनियर निवड समितीमध्ये ४ वर्ष असल्यामुळे पात्र नाही)


प्रीतम गंधे (विदर्भ, ज्युनियर राष्ट्रीय निवड समितीमधला कार्यकाळ आधीच पूर्ण)