इतिहास घडवण्यापासून इंग्लंडचा एलिस्टर कूक एक पाऊल दूर
इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये पहिल्या टेस्टला लॉर्ड्सच्या मैदानात सुरुवात झाली आहे.
लंडन : इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये पहिल्या टेस्टला लॉर्ड्सच्या मैदानात सुरुवात झाली आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडचा क्रिकेटपटू एलिस्टर कूकनं ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेली एलिस्टर कूकची ही लागोपाठ १५३वी टेस्ट आहे. लागोपाठ एवढ्या टेस्ट खेळण्याचा रेकॉर्ड बॉर्डर यांच्याच नावावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये कूक बॉर्डर यांचं हे रेकॉर्ड मोडेल. कूकनं त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण १५५ टेस्ट खेळल्या आहेत. २००६ साली भारताविरुद्ध नागपूर टेस्टमधून पदार्पण केलं होतं. याच टेस्टमध्ये कूकनं पहिलं शतक झळकावलं होतं. पण आजारी पडल्यामुळे कूकला या सीरिजमधल्या पुढच्या टेस्टला मुकला होता. यानंतर मात्र कूक प्रत्येक टेस्ट मॅच खेळला.
टेस्ट क्रिकेटमध्ये कूकनं १२ हजारांपेक्षा जास्त रन केल्या आहेत. कूकच्या नावावर ३२ शतकांचा समावेश असून ४५.८३ च्या सरासरीनं त्यानं रन केल्या आहेत. बॉर्डर यांनी त्यांची १५३वी मॅच खेळली तेव्हा ते ३८ वर्षांचे होते तर कूक आता फक्त ३३ वर्षांचा आहे. कूकच्या या रेकॉर्डचं बॉर्डर यांनीही कौतुक केलं आहे आणि त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.