Imane Khelif vs Angela Carini : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सध्या रोमांचक लढती पहायला मिळत आहेत. अशातच अल्जेरियाच्या इमाने खेलिफने महिलांच्या 66 किलो वजनी प्राथमिक बॉक्सिंग सामन्यात इटलीच्या अँजेला कॅरिनीचा पराभव केला. इमाने खेलिफसमोर इटालियन महिला बॉक्सरने अवघ्या 46 सेकंदात रिंगमधून माघार घेतली. इमाने खेलिफने पहिल्या मिनिटातच दोन जोरदार पंच मारल्याने अँजेलाला दोन वेळा सामना थांबवावा लागला. अखेर अँजेलाने माघार घेतली अन् इमाने खेलिफला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, हा सामना वादात सापडला आहे. त्याचं कारण जेंडर पात्रता वाद...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅरिनीच्या चेहऱ्यावर दोनदा प्रहार झाला आणि दोनदा तिच्या कोपऱ्यात गेली. कॅरिनी इमानेचे फटके सहन करू शकत नव्हती. या पराभवानंतर कॅरिनी रिंगमध्येच ढसाढसा रडू लागली. लिंगबदल करून पुरूषाची स्त्री झालेल्या इमाने खेलिफविरुद्ध आणि कॅरिनीसाठी आता जगभरात आवाज उठवला जात आहे. पुरुषाच्या बळावर त्यांना स्पर्धा करायला लावणे योग्य नसल्याचे महिला खेळाडूंचे म्हणणे आहे. अल्जेरियाची इमाने खेलिफ ही आधी पुरूष होती. त्यानंतर तिने लिंगबदल केला होता. त्यामुळे आता ऑलिम्पिक कमिटीच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे.



खेलिफची निवड योग्य?


इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने लिंग चाचण्यांमध्ये खेलिफ अयशस्वी ठरल्यानंतर अल्जेरियन ऑलिम्पियनला 2023 च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. रॉयटर्सच्या मते, खेलिफमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढलेली आढळली होती. अशातच आता खेलिफला ऑलिम्पिक खेळण्याची मान्यता कुणी दिली? असा सवाल विचारला जात आहे. तर काहींनी खेलिफची निवड योग्य असल्याचं देखील म्हटलं आहे.


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेलीफला स्पर्धेसाठी मंजुरी दिली होती. ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी त्यावेळी या निर्णयाचे स्पष्टीकरण दिलं. डीएनए चाचण्यांच्या आधारे, आम्ही अशा अनेक खेळाडूंची ओळख पटवली होती. चाचण्यांच्या निकालांनुसार, त्यांच्यात XY गुणसूत्र असल्याचं सिद्ध झालं, अशा खेळाडूंना स्पर्धेतून आधीच वगळण्यात आलं होतं, अशी माहिती उमर क्रेमलेव्ह यांनी रशियाच्या टास न्यूज एजन्सी दिली आहे.



पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी नाराज


दरम्यान, इटालियन अधिकाऱ्यांनी खेलीफच्या पात्रतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतेही निश्चित, कठोर, एकसमान निकष नाहीत हे आश्चर्यकारक आहे, असं इटालियन क्रिडा मंत्र्यांनी म्हटलं आहे. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील नाराजी व्यक्त केली. "मला वाटतं की ज्या खेळाडूंमध्ये पुरुष अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत त्यांनी महिलांच्या स्पर्धांमध्ये प्रवेश करू नये", असं जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं आहे.