Jasprit Bumrah: येत्या 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये सर्व चाहत्यांचं लक्ष मुंबई इंडियन्सकडे असणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्ससोबत खेळवला जाणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची टीम खेळणार आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या टीम कॅम्पमध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. याचं कारण म्हणजे जसप्रीत बुमराहने अजून कॅम्प जॉईन केलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्व काही ठीक आहे की नाही, असा अंदाज लावला जातोय. सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांच्या मते हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यानंतर अनेक खेळाडू खूश नाहीत, त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये सर्व काही ठीक नसल्याचं दिसून येतंय.


जसप्रीत बुमराह कधी येणार टीममध्ये?


नुकतंच टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळली. जसप्रीत बुमराह त्या टीम इंडियाचा एक भाग होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह 21 मार्चला थेट अहमदाबादला पोहोचणार आहे. आणि त्याचवेळी तो मुंबई इंडियन्स टीममध्ये सामील होईल. मुंबई इंडियन्सची टीम 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये सराव करतेय. मात्र जसप्रीत बुमराहच्या न येण्याबाबत सतत तर्कवितर्क लावले जातात. परंतु असं मानलं जातंय की, इंग्लंड टेस्ट सिरीजमुळे तो मुंबई इंडियन्सच्या कॅम्पचा भाग होऊ शकला नाही.


हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार मुंबई इंडियन्स


आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत करार केला. यावेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. इतकंच नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवलं. फ्रँचायझीचं हे पाऊल चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. सोमवारी मुंबई इंडियन्सच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि टीमचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर सहभागी झाले होते. मात्र यावेळेस दोघांनीही कर्णधारपदाचा निर्णय असा तडकाफडकी का घेण्यात आला या प्रश्नाचं उत्तर टाळलं. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओमध्ये या दोघांनी जाणीवपूर्वकपणे या प्रश्नाचं उत्तर टाळल्याचं दिसून आलं.