दोन वर्षानंतर टीम इंडियामध्ये चेन्नईच्या संघात अंबातीचे पुनरागमन
इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० संघाची घोषणा झालीये. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात अंबाती रायडूचे पुनरागमन झालेय.
मुंबई : इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० संघाची घोषणा झालीये. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात अंबाती रायडूचे पुनरागमन झालेय. रायडू सध्या आयपीएल २०१८मध्ये चेन्नई संघाकडून खेळतोय. आयपीएलमधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात जागा मिळालीये. वनडे सीरिजसाठी भारतीय संघात पुनरागमन करणारा रायडू १५ जून २०१६मध्ये शेवटची वनडे झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. २०१६ नंतर त्याला संघात स्थानच देण्यात आले नव्हते.
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर अंबाती सतत टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र ३२ वर्षीय क्रिकेटरने कधी हार मानली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये अंबाती रायडूने १० सामन्यांत ४२३ धावा केल्यात. चेन्नई संघासाठी तो सलामीवीराची भूमिका निभावतोय. मात्र त्याने आपल्या संघाला निराश केलेले नाहीये.
अंबाती रायडू संघातील एक महत्त्वाचा क्रिकेटर आहे. त्याने १५१.६१च्या स्ट्राईक रेटने धावा केल्यात. काही वेळेस रायडूने मधल्या फळीतीलही जबाबदारी सांभाळली. मधल्या क्रमांकावरही त्याची कामगिरी चांगलीच राहिली. आता रायडू इंग्लंड दौऱ्यात खेळण्यासाठी सज्ज झालाय. याआधी २०१४मध्ये त्याने इंग्लंड दौरा केला होता. त्यावेळी तो वनडे आणि टी-२० या दोन्ही संघात होता.
दोन वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूचे ट्विटरकरांनी जोरदार स्वागत केले.