जोधपूर :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी क्रिकेटर हार्दिक पांड्या अडचणीत आलेल्या हार्दिक पांड्याला दिलासा मिळालेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेलं ट्विट हार्दिक पांड्याच्या अकाऊंटवरून नाही तर फेक अकाऊंटवरून करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबातचं आक्षेपार्ह ट्विट @sirhardik3777 या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं होतं. पण हार्दिक पांड्याचं अधिकृत ट्विटर हॅण्डल @hardikpandya7 आहे.


हार्दिकविरोधात कोर्टाचे एफआयआर दाखल करण्याचे आदेश


जोधपूरच्या विशेष एससी/एसटी कोर्टाने पोलिसांना हार्दिकविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारली होती.


पांड्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे डी. आर. मेघवाल यांच्या म्हणण्यानुसार, २६ डिसेंबर २०१७मध्ये पांड्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात विधान केले होते.  या पोस्टमध्ये पांड्याने केवळ डॉ. आंबेडकरांचाच अपमान केला नाही तर दलित समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप मेघवाल यांनी केलाय.


काय होतं ते ट्विट?


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेघवाल यांच्या मते पांड्याने कोण आंबेडकर? असे ट्वीट केले होते. तसेच पांड्याने ट्विटमध्ये ती व्यक्ती ज्यांनी देशाचे संविधान लिहिलेय वा ते ज्यांनी देशाला आरक्षण नावाचा आजार दिला, असे म्हटल्याचा आरोप मेघवाल यांनी केलाय. मेघवाल खुद्द राष्ट्रीय भीम सेनाचे सदस्य असल्याचे सांगतात.