नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि १९८३ मध्ये टीमला विश्वचषक मिळवून देणारा खेळाडू कपिल देव याची भेट भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली. ही भेट शुक्रवारी १ जून रोजी रात्री कपिल देव याच्या घरी झाली. शाह यांनी कपिल देवच्या निवासस्थानी खास हजेरी लावली. यावेळी कपिल देव याची पत्नीही उपस्थित होती. याआधी अमित शाह यांनी लष्कराचे माजी अध्यक्ष जनरल दलबीर सिंग सुहाग यांच्याशी चर्चा केली. शाह यांच्या भेटीनंतर कपिन देव भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा सुरु झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजावर अमित शाह यांनी चर्चा केली. सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी अमित शाह आले होते. मात्र भाजपला समर्थन देण्याबाबत किंवा निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं कपिल देव याने स्पष्ट केले आहे. अमित शाहांनी कपिलची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र कपिल देव याने भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  


अमित शाह यांनी कपिलच्या भेटीनंतर ट्विट करत एक चांगली चर्चा झाल्याचे म्हटलेय. नरेंद्र मोदी सरकारला ४ वर्ष झाल्याने भाजपने संपर्क अभियान सुरु केलेय. त्याचाच एक भाग म्हणून ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. 'संपर्क फॉर समर्थन' हे अभियान भाजपने सुरु केले आहे.