IPL 2019: सानिया मिर्झाची बहिण या क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार!
आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकाता आणि हैदराबादची मॅच बघण्यासाठी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पोहोचली होती.
हैदराबाद : आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकाता आणि हैदराबादची मॅच बघण्यासाठी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पोहोचली होती. सानिया मिर्झासोबत तिची बहिणी अनम मिर्झाही मॅचचा आनंद घेत होती. पण अनमसोबत असलेल्या क्रिकेटपटूच्या मुलानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. सानिया मिर्झा, अनम मिर्झा आणि मोहम्मद अजहरुद्दीनचा मुलगा असद हैदराबादची मॅच बघण्यासाठी पोहोचले. अनम आणि असद हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा आहे.
सानिया मिर्झानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून असदसोबतचे फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत सानियाने बदामाची स्माईली टाकून 'फॅमिली' असं लिहिलं होतं. सानियाच्या या पोस्टमुळे अनम आणि असद यांच्या नात्याला ग्रीन सिग्नल मिळाल्याचंही बोललं गेलं.
सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा आणि अजहरुद्दीनचा मुलगा असद हे दोघं लग्न करतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सानियानेही असद हा आपल्या कुटुंबाचा एक भाग असल्याचं सांगितलं आहे.
असद आणि अनम या दोघांचं लग्न या वर्षाच्या शेवटी होईल, अशी शक्यता आहे. पण याबद्दल अजून दोघांच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीकडून दुजोरा मिळालेला नाही.
अनमने याआधी हैदराबादचा व्यावसायिक अकबर रशीद याच्याशी २०१६ मध्ये लग्न केलं होतं. हे लग्न फार काळ टिकलं नाही. मागच्या वर्षी दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर अनम आणि असद यांच्यातली जवळीक वाढली.
अनम मिर्झा ही फॅशन आऊटलेट 'द लेबल बाजार' याची मालकीण आहे. अनम ही असदपेक्षा तीन वर्ष मोठी आहे.
तर असदला आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू व्हायचं आहे. असद हा सध्या गोव्याच्या रणजी टीमकडून खेळत आहे.