Anand Mahindra Gift To Praggnanandhaa: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनला (Praggnanandhaa) इलेक्ट्रीक कार भेट देण्याची घोषणा केली आहे. बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या 18 वर्षीय प्रज्ञाननंदनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याच्या उद्देशाने ही भेट दिली जाणार आहे. आनंद महिंद्रांनी 'एक्स'वरुन (ट्विटरवरुन) ही घोषणा केल्यानंतर आता यावर प्रज्ञाननंदनने प्रतिक्रिया नोंदवली आहे.


आनंद महिंद्रा नेहमीच देतात खेळाडूंना प्रोत्साहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर आनंद महिंद्रा नेहमीच उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. यापूर्वी आनंद महिंद्रांनी भारतीय तरुण क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरीसाठी थार गाडी भेट दिली होती. भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रालाही आनंद महिंद्रांनी XUV 700 भेट दिली होती. आता आनंद महिंद्रांनी चेस वर्ल्ड कपमध्ये भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर उज्ज्वल करणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदलाही एक कार भेट देणार आहेत. खरं तर हा निर्णय आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काही चाहत्यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देताना केली.


प्रज्ञानंदनला थार देण्याची मागणी


झालं असं की, प्रज्ञानंदनने चेस वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर त्याला थार कार गिफ्ट करा अशी मागणी नेटकऱ्यांनी आनंद महिंद्रांकडे केली. यावर आनंद महिंद्रांनी रिप्लाय देत प्रज्ञाननंदला कार देण्याऐवजी दुसरा पर्याय सुचवला. प्रज्ञाननंदला थार कार देण्याऐवजी पालकांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रज्ञाननंदनच्या पालकांना कार देणार असल्याची घोषणा केली. तसेच थारऐवजी इलेक्ट्रिक कार भेट म्हणून देणार असल्याची माहिती आनंद महिंद्रांनी दिली.


प्रज्ञाननंदनसाठी केली ही घोषणा


"बरेच जण मला प्रज्ञाननंदला एक थार भेट देण्याचा आग्रह करत आहेत. पण माझ्याकडे अन्य एक कल्पना आहे. मुलांना बुद्धिबळाची ओळख करून देण्यास प्रोत्साहित करणाऱ्या पालकांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. व्हिडीओ गेम्सचा वापर वाढलेला असतानाही बुद्धीबळासारख्या खेळात मुलांना चालना देणाऱ्या पालकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे असं करणं म्हणजे उज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. जसं इलेक्ट्रीक कार या आपल्या पृथ्वीच्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक आहेत तशीच ही गोष्ट आहे. मला वाटतं आपण प्रज्ञानंदनच्या पालकांना एक्सयुव्ही 400 ईव्ही भेट करावी. ही कार श्रीमती नागलक्षमी आणि श्री रमेशबाबू (प्रज्ञानंदनचे पालक) यांना दिली जावी. आपल्या मुलाची आवड जोपासल्याबद्दल आणि त्याला पाठिंबा दिल्याबद्दल ते यासाठी पात्र आहेत," असं महिंद्रांनी ट्वीटमध्ये म्हटलं.



प्रज्ञाननंदनने नोंदवली पहिली प्रतिक्रिया


आनंद महिंद्रांनी घेतलेल्या याच निर्णयावर आता प्रज्ञाननंदनने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आनंद महिंद्रांचं ट्विट कोट करुन रिट्वीट करताना प्रज्ञाननंदनने त्यांचे आभार मानले आहेत. "तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आनंद महिंद्रा सर आणि राजेश जेजुरीकर सरांचे आभार. माझ्या पालकांचं फार पूर्वीपासूनचं स्वप्न होतं की आपल्या मालकीची एखादी इलेक्ट्रीक कार असावी. त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याबद्दल धन्यवाद," असं प्रज्ञाननंदने म्हटलं आहे.


नक्की पाहा हे फोटो >> PM मोदींच्या घरी पालकांसहीत पोहोचला ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद! दोघांमधील चेसबोर्ड चर्चेत


महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि सीईओ राजेश जेजुरीकर यांना आनंद महिंद्रांनी टॅग केलं होतं. त्यामुळे प्रज्ञाननंदने त्यांचेही आभार मानले आहेत. या ट्वीटमध्ये प्रज्ञाननंदने हात जोडण्याचा म्हणजेच नमस्कार करत असल्याचा इमोजीही वापरला आहे.



दरम्यान, प्रज्ञाननंदने भारतात परतल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.