बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगतदार सामना झाला. भारताने सुपरओव्हरमध्ये हा सामना जिंकत अफगाणिस्तानला 3-0 ने व्हाईटवॉश दिला. तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली एकही धाव करु शकला नाही, मात्र त्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत सर्वांना पुन्हा एकदा आपल्या फिटनेसची झलक दाखवली. विराट कोहलीने नजीबुल्लाह जादरानचा धावत झेल घेतला, तर सीमेवर उंच उडी मारुन पाच धावाही वाचवल्या. विराट कोहलीने हवेत झेप घेत केलेल्या या क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योजक आनंद महिंद्रादेखील विराट कोहलीचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहून भारावले आहेत. आनंद महिंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "हॅलो, आयजॅक न्यूटन? गुरुत्वाकर्षण विरोधी या घटनेला जबाबदार धरण्यासाठी तुम्ही आम्हाला भौतिकशास्त्राचा नवीन नियम परिभाषित करण्यात मदत करू शकता का?".


विराट कोहलीच्या व्हिडीओवर नेटकरीही कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, विराट कोहलीने अविश्वनीय कामगिरी केली आहे. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, स्टेडिअममध्ये हे लाईव्ह पाहिल्याचा गर्व आहे. ज्याप्रकारे मैदानात प्रेक्षक कोहली-कोहली ओरडत होते ते अविश्वसनीय होतं. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'न्यूटनने कोहलीला भेटायला हवं, जिथे भौतिकशास्त्राचा नियम लागू होत नाही आणि क्रिकेटचा नियम त्यावर जड होतो'.



सामन्यात नेमकं काय झालं?


भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहितच्या या निर्णयाला साजेशी कामगिरी केवळ रोहितने स्वत: आणि रिंकू सिंहने केली. रिंकूने 39 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या. तर रोहित शर्माने 69 चेंडूंमध्ये 121 धावांची भन्नाट खेळी केली. या दोघांची जोडी जमण्याआधी भारताने 22 धावांवर 4 गडी गमावले होते. रिंकू आणि रोहित शर्माने नाबाद 190 धावांची पार्टनरशीप केली. भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 212 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननेही इतक्याच धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.



20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात अफगाणिस्तानने 212 धावा केल्या. अफगाणिस्तानी संघाकडून रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जारदान आणि गुलबदीन नैब या तिघांनी अर्धशतकं झळकावली. नैबने 23 चेंडूंमध्ये 55 धावांची नाबाद खेळी केली. तर मोहम्मद नबीने 16 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. दोन्ही संघाच्या समान धावा राहिल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 1 विकेटच्या मोबदल्यात 16 धावा केल्या. भारताने सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने सलग 2 षटकार लगावले. पाचव्या बॉलवर एक धाव काढून रोहित रिटायर्ड आऊट झाला. शेवटच्या बॉलवर भारताला विजयासाठी 2 धावा हव्या होत्या. मात्र भारताला एकच धाव करता आली आणि पुन्हा नव्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली.


दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने पहिल्यांदा बॅटिंग केली. रोहित शर्माने पहिल्या 2 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर रिंकू सिंह बाद झाला. पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा धावबाद झाला. भारताने 11 धावा केल्या. अफगाणिस्तानी संघ तिसऱ्यांदा मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताचा फिरकीपटू रवि बिश्नोईने 3 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला.