कॅनबेरा: ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सोमवारी इंग्लंडच्या अँडी मरे याला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या रॉबर्टो बाऊटिस्टा अग्युटने मरेला ६-४, ६-४, ६-७ (५), ६-७ (४), ६-२ अशा सेटमध्ये पराभूत केले. अँडी मरे याने यापूर्वीच टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ही त्याची शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा होती. मात्र, कारकीर्दीतील हा त्याचा अखेरचा सामना असेल का, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.




रॉबर्टो बाऊटिस्टा अग्युटने सुरुवातीचे दोन सेट सहज खिशात घातले. त्यामुळे मरेचा एकतर्फी पराभव होणार, असे वाटत होते. मात्र, यानंतरच्या दोन सेटमध्ये अँडी मरेने झुंजार खेळाचे प्रदर्शन करत हा सामना पाचव्या सेटपर्यंत नेला. मरेचा उजवा गुडघा दुखावला असूनही त्याने जिगरबाज खेळ केला. एका क्षणाला अँडी मरे हा सामना जिंकेल, असेही प्रेक्षकांना वाटत होते. मात्र, बाऊटिस्टा अग्युटने मरेची सर्व्हिस दोनदा ब्रेक करत निर्णायक सेटमध्ये ५-१ अशी आघाडी घेतली. शेवटच्या सर्व्हिसवेळी मरेने प्रेक्षकांना रॅकेट उंचावून अभिवादनही केले. मात्र, मरेने पाचवा सेट ६-२ असा गमावल्याने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. हा सामना ४ तास ९ मिनिटे चालला.