Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंना झालेली धक्काबुक्की पाहून कुंबळे संतापला! म्हणाला, `आपल्या कुस्तीपटूंबरोबर...`
Anil Kumble on Wrestlers Protest: या प्रकरणावर यापूर्वी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भाष्य करताना कुस्तीपटूंना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागत असल्याचं पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर कुंबळेने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Anil Kumble on Wrestlers Protest: दिल्लीमध्ये भारतीय कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप भारतामधील अनेक नामवंत महिला कुस्तीपटूंनी केला आहे. मागील दीड महिन्यापासून सुरु असलेल्या या आंदोलनाला 28 मे रोजी वेगळं वळण मिळालं जेव्हा दिल्ली पोलिसांनी सक्तीने या आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना आंदोलन सुरु असलेल्या जंतर-मंतरवरुन हटवलं. या कारवाईदरम्यान साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासारख्या कुस्तीपटूंबरोबर जबरदस्ती झाल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या कुस्तीपटूंविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आता कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगेत वाहणार आहोत (Immerse Medals In Ganga) असं म्हटलं आहे. मात्र यासाठी त्यांनी आता 5 दिवसांची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर कोणताही क्रिकेटपटू किंवा कलाकार या कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे नसल्याची टीका होत असतानाच भारताचा माजी फिरकीपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला आहे. अनिल कुंबळे हा या प्रकरणी भाष्य करणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला असून त्याने या प्रकरणावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
अनिल कुंबळेने व्यक्त केली नाराजी
गंगेमध्ये मेडल्स विसर्जित करण्यासाठी महिला कुस्तीपटू मंगळवारी सायंकाळी गंगाकिनारी पोहचले. मात्र यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी त्यांची समजूत घालून मेडल्स गंगेत विसर्जित न करण्याची मागणी केली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर या कुस्तीपटूंनी मेडल्स विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मागण्यांवर पुढील 5 दिवसांमध्ये कोणताही निर्णय झाला नाही तर मात्र आपण मेडल्स विसर्जित करणार असं या कुस्तीपटूंनी सांगितलं. दरम्यान आजपासून म्हणजेच 31 मेपासून दिल्लीमध्ये हे कुस्तीपटू आमरण उपोषण सुरु करणार आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेने ट्वीटरवरुन भाष्य केलं आहे. जे काही कुस्तीपटूंबरोबर झालं ते पाहून आपण निराश झाल्याचं कुंबळेनी म्हटलं आहे. अगदी मोजक्या शब्दांमध्ये कुंबळेने आपलं मत नोंदवलं आहे.
नेमकं काय म्हणाला कुंबळे?
28 मे रोजी झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ज्या पद्धतीने कुस्तीपटूंना धक्काबुक्की झाली ते पाहून निराश झाल्याचा उल्लेख कुंबळेनं केला. तसेच योग्य संवादामधूनच या विषयावर मार्ग निघू शकतो असंही कुंबळेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. "28 मे रोजी आपल्या कुस्तीपटूंबरोबर जे काही घडलं ते ऐकून निराश झालो आहे. योग्यपद्धतीने संवाद साधल्यास कोणत्याही गोष्टीवर तोडगा काढता येतो. लवकरात लवकर यावरही तोडगा निघेल अशी अपेक्षा," असं अनिल कुंबळेंने आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
बृजभूषण काय म्हणाले?
दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी या मेडल विसर्जनावर बोलताना माझा कार्यकाळ संपत आला असल्याचं सांगितलं. तसेच मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई केली जाईल. सध्या चौकशी सुरु आहे. आताच्या परिस्थितीत आम्ही कुस्तीपटूंना काय मदत करु शकतो? असा प्रतिप्रश्नच बृजभूषण शरण सिंह यांनी विचारला आहे.