कोलंबो : श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५०० जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे थोडक्यात बचावला आहे. अनिल कुंबळे हा सुट्ट्यांसाठी श्रीलंकेमध्ये गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कुंबळे ज्या हॉटेलमध्ये हल्ला झाला त्या शांग्री-ला या हॉटेलमध्ये राहत होता. पण याला नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी कुंबळे सकाळी ६ वाजता हॉटेलमधून निघाला. शांग्री-ला हॉटेलमध्ये सकाळी ८.४५ च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटांनंतर कुंबळे श्रीलंकेमधली सुट्टी अर्धवट सोडून भारतात परतला आहे. ही माहिती अनिल कुंबळेने ट्विटरवरून दिली आहे. याच हॉटेलमध्ये शुक्रवारी आम्ही नाश्ता केला होता, असं कुंबळे ट्विटरवर म्हणाला आहे.



आयसिस या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटची जबाबदारी स्वीकारली आहे. आयसिसने आपल्या अमाक न्यूज वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित केली.


सुरुवातीला या हल्ल्यामागे श्रीलंकेतील नॅशनल ताहिद जमात या संघटनेचा सहभाग असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. तर काही वेळापूर्वीच श्रीलंकेच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी ख्राईस्टचर्च हल्ल्याचा बदला म्हणून श्रीलंकेत बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा दावा संसदेत केला होता. प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच आयसिसने पुढे येत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अनेक तज्ज्ञ या हल्ल्यांमागे आयसिस, अल कायदा, लष्कर ए तोयबा आणि काही प्रमाणात अफगाण तालिबान या संघटनांचा हात असल्याचे सांगत होते. कारण, आजघडीला इतके सुनियोजित बॉम्बस्फोट करण्याची क्षमता अन्य संघटनांकडे नाही. अखेर आयसिसचा या हल्ल्यामागील सहभाग समोर आला आहे.


एकूण सात आत्मघाती हल्लेखोर यात सामील होते. रविवारी चर्च व पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या स्फोटात आतापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५०० जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी २४ संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण अल्पसंख्य मुस्लिम समाजाचे आहेत. या २४ पैकी नऊ जणांना न्यायालयाने कोठडी दिली आहे.