आठवतोय का तो दिवस? मुंबई, धोनी, षटकार..... आणि विश्वविजेतेपद!
महेंद्रसिंह धोनी याने एक जोरदार फटका लगावत चेंडू पार सीमामरेषेपलीकडे पाठवला आणि....
मुंबई : साधारण नऊ वर्षांपूर्वी भारतीय क्रीडा विश्वात एक अशी नवी पहाट झाली होती, ज्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटला वेगळी कलाटणी मिळाली होती. मुळात याची सुरुवात फार आधीपासूनच झाली होती. पण, आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी यावर शिक्कामोर्तबही झालं. औचित्य होतं ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचं.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे श्रीलंका या क्रिकेट संघाविरोधात विश्वचषकाची अंतिम फेरी खेळत असताना अखेरच्या क्षणी त्यावेळी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याने एक जोरदार फटका लगावत चेंडू पार सीमामरेषेपलीकडे पाठवला. धोनीचा हा षकटार संघाला विश्वविजेतेपद देऊन गेला आणि काही क्षणांसाठी खुद्द धोनीच्याही नजरा स्वप्नांचा पाठलाग करत जाणाऱ्या आणि सीमारेषा ओलांडणाऱ्या त्या चेंडूवरच खिळल्या होत्या.
भारतीय संघाच्या या विजयी क्षणाविषयी लिहिता बोलताना कायमच मनात प्रचंड अभिमानाची भावना दाटून येते. एक वेगळाच उत्साह यावेळी प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर खुलतो. २०११ मधील विश्वचषक विजयामुळे जवळपास २८ वर्षांपासूनचा दुष्काळही त्यावेळी दूर झाला होता. या स्पर्धेदरम्यान सुरुवातीपासूनच संघाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.
साखळी सामन्यांपासूनच भारतीय संघातील खेळाडूंच्या बळावर संघाने उत्तमोत्तम कामगिरी केली. पुढे अंतिम फेरीनजीक असतानाच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांना नमवत धोनी ब्रिगेडनं अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं होतं. मुंबईत पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या या अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचकडून आलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या सलामीच्या जोडीने क्रीडारसिकांना काहीसं नाराज केलं. पण, पुढे गौतम गंभीरनं ९७ धावांची दमदार खेळी खेळत संघाला आधार दिला. त्याला साथ मिळाली ती म्हणजे विराट कोहलीच्या ३५ धावांची.
कोहली तंबूत परतल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंग यांच्या जोडीनं श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना करण्यास सुरुवात केली. अखेर धोनीने विजयी षटकार लगावत संघाच्या शिरपेचात विश्वविजेतेपदाचा मानाचा तुरा खोवला आणि भारतीय क्रिकेच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांमध्ये लिहिला गेला.