लीड्स : अत्यंत रोमहर्षक अशा ऍशेसच्या तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा १ विकेटने विजय झाला आहे. बेन स्टोक्सच्या नाबाद १३५ रनच्या खेळीमुळे इंग्लंडने जवळपास गमावलेली मॅच पुन्हा जिंकली. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी ३५९ रनची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था २८६/९ अशी झाली होती. पण बेन स्टोक्सने जॅक लीचच्या मदतीने शेवटच्या विकेटसाठी नाबाद ७६ रनची पार्टनरशीप केली. यातली फक्त १ रन जॅक लीचच्या बॅटने आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या क्षणी अंपायरने केलेल्या चुकीचा फायदाही इंग्लंडला झाला. १२५व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला बेन स्टोक्स बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलियाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. पण अंपायरने स्टोक्सला आऊट दिलं नाही. रिप्ले बघितल्यानंतर स्टोक्स आऊट दिसत होता. पण एकही रिव्ह्यू बाकी नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पदरी निराशा आली. 


१२४ व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने घेतलेला चुकीचा रिव्ह्यू त्यांना पुढे महागात पडला. १२४व्या ओव्हरच्या शेवटचा बॉल पॅट कमिन्सने लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. हा बॉल लिचच्या पायाला लागला. लेग स्टम्पच्या बाहेर पडलेला बॉल दिसत असतानाही ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला आणि याचा फटका त्यांना पुढच्याच ओव्हरमध्ये बसला.


३५९ रनचा पाठलाग करताना स्टोक्सच्या शतकासोबत कर्णधार जो रूटने ७७ रन आणि जो डेनलीने ५० रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर नॅथन लायनला २ विकेट घेण्यात यश आलं. पॅट कमिन्स आणि जेम्स पॅटिन्सनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


५ टेस्ट मॅचच्या ऍशेसमध्ये या विजयासोबतच इंग्लंडने पुनरागमन केलं आहे. इंग्लंडने पहिली टेस्ट मॅच गमावल्यानंतर दुसरी टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. त्यामुळे आता ऍशेस सीरिज १-१ने बरोबरीत आहे.


इंग्लंडचा यशस्वी पाठलाग


या विजयासोबतच इंग्लंडने विक्रमालाही गवसणी घातली आहे. ३५९ रनचा पाठलाग हा इंग्लंडचा सगळ्यात यशस्वी आहे. याआधी १९२८-२९ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच ३३२ रनचा यशस्वी पाठलाग केला होता. १०व्या विकेटसाठीची स्टोक्स आणि लिचमधली नाबाद ७६ रनची ही दुसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप होती. श्रीलंकेच्या कुसल परेरा आणि विश्व फर्नांडो यांच्या नावावर हा विक्रम आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१९ साली नाबाद ७८ रनची पार्टनरशीप केली होती.