मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी युवराज, रैना आणि अमित मिश्राला वगळून निवड समितीनं आशिष नेहराला संधी दिली. ३८ वर्षांच्या नेहराचं टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे निवड समितीच्या निर्णयावर टीकाही करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा आशिष नेहरा निवृत्तीचा विचार करत असल्याची बातमी मुंबई मिररनं दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजवेळी नेहरा निवृत्तीची घोषणा करू शकतो, असं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे.


१ नोव्हेंबरला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-20 मॅच खेळवली जाणार आहे. ही मॅच नेहराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली शेवटची असू शकते. दिल्ली हे आशिष नेहराचं होम ग्राऊंड आहे. याच मैदानातून नेहरानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, त्यामुळे याच मैदानामध्ये निवृत्ती घ्यायचा नेहरा विचार करत असल्याचं बोललं जात आहे.


खेळाडूंचा फिटनेस बीसीसीआयनं आणखी कडक केला आहे. त्यामुळे ३८ व्या वर्षी असा फिटनेस ठेवणं नेहराला कठीण जात आहे. पूर्णपणे फिट नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्येही नेहरा खेळू न शकल्याची चर्चा आहे.