मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी आशिष नेहराची निवड झाली आहे. ३८ वर्षाच्या नेहराची निवड केल्यामुळे निवड समितीवर टीकाही होत आहे. नेहरानं मात्र या गोष्टींचा मी विचार करत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या भारतीय क्रिकेट टीममध्ये सर्वाधिक वय असलेला खेळाडू आशिष नेहरा आहे. इतक्या वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरा सात कर्णधारांबरोबर खेळला आहे.


आशिष नेहरा सध्याचा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीबरोबर खेळला आहे. याचबरोबर तो धोनी, द्रविड, गंभीर, गांगुली, सेहवाग आणि अजहरच्या कर्णधारपदाखालीही नेहरा खेळला आहे.


१९९९ मध्ये नेहराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. अजहरुद्दीनच्या कर्णधारपदाखाली नेहरा पहिली मॅच खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरानं १७ टेस्टमध्ये ४४ विकेट घेतल्या, तर १२० वनडेमध्ये त्याला १५७ विकेट घेण्यात यश आलं. २६ टी-20मध्ये नेहरानं ३४ विकेट घेतल्या आहेत.


आशिष नेहरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मॅच सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाखाली खेळल्या आहेत. गांगुली कर्णधार असताना नेहरा ७७ टेस्ट आणि वनडे मॅच खेळला, यामध्ये त्याला ११५ विकेट मिळाल्या. यामध्ये २००३च्या वर्ल्ड कपमधली इंग्लंडविरुद्धची मॅचही समाविष्ट आहे. या मॅचमध्ये नेहरानं २३ रन्स देऊन ६ विकेट घेतल्या होत्या.


गांगुलीनंतर नेहरा धोनीच्या कर्णधारपदाखाली सर्वात जास्त खेळला. धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळताना नेहरानं ६४ मॅच खेळून ८७ विकेट घेतल्या.