मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या करिअरचा हा शेवटचा सामना त्याचं होमग्राऊंड असलेल्या नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात खेळला जात आहे. ३८ वर्षांच्या आशिष नेहरानं करिअरमध्ये १७ कसोटी, १२० वन डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.


आशिष नेहराने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये टीम इंडियात जागा मिळवली होती. त्या वेळी त्याने श्रीलंका दौऱ्यातल्या कोलंबो कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तब्बल १९ वर्ष तो टीम इंडियासाठी खेळला आहे. इतकेच नाही तर चक्क आठ कर्णधारांच्या नेतृत्वात त्याने खेळ केला. त्यात मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली या कर्णधारांचा समावेश आहे. 


हे आहेत सर्वात चलाख खेळाडू


आशिषचा अनुभव पाहता त्याला चांगल्या खेळाडूंची चांगलीच पारख असेल हे मान्य करावंच लागेल. याच अनुभवातून त्याने टीम इंडियातील दोन खेळाडूंना सर्वात चलाख असल्याचे म्हटले आहे. यातील एक नाव म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. तर दुसरं नाव एकेकाळी आपला करिश्मा दाखवणा-या अजय जडेजाचं आहे. 


नेहरा म्हणाला की, “अजय जडेजाच्या क्रिकेट कौशल्याचा मी खूपच सन्मान करतो. माझ्यासाठी एम एस धोनी आणि अजय जडेजा हे क्रिकेट जगतातील सर्वात हुशार बुद्धीमत्तेचे खेळाडू आहेत”.


करिअरमधील ‘तो’ क्षण बदलेले...


संधी मिळाली तर करिअरमधील कोणता क्षण बदलशील असे विचारल्यावर त्याने सांगितले की, ‘माझी २० वर्षीय कारकीर्द रोमांचक राहिली. मी १९९७ मध्ये दिल्लीकडून खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाने जिंकलेल्या विश्वकप विजयी संघात माझा समावेश होता. मात्र माझ्या मनात खंत आहे, ती म्हणजे २००३ च्या वर्ल्ड कप फायनलची. जर मला २० वर्षांच्या कारकिर्दीत काही बदलायचं असेल, तर मी २००३ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपचा फायनल सामना बदलेन. मात्र आता ते शक्य नाही’.