अश्विन भडकला! या खेळाडूला म्हणाला फिक्सर
भारताचा क्रिकेटपटू आर.अश्विन त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो.
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू आर.अश्विन त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेटमधल्या वादांपासून अश्विन नेहमीच लांब राहतो पण यंदा मात्र अश्विन जास्तच भडकलेला पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन हर्शल गिब्सनं केलेल्या मस्करीला प्रत्युत्तर देताना त्याला फिक्सर म्हणाला. पण थोड्यावेळानंतर अश्विननं हे ट्विट डिलीट केलं.
हा सगळा प्रकार एका बुटाच्या ब्रॅण्डचं प्रमोशन करताना झाला. अश्विननं या बुटाच्या ब्रॅण्डचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. या बुटांमुळे पळणं सोपं होईल, असं अश्विन म्हणाला. अश्विनच्या या ट्विटवर हर्षल गिब्सनं प्रतिक्रिया दिली. आता तू आणखी जोरात पळू शकशील, असा टोमणा गिब्सनं अश्विनला लगावला.
गिब्सचं हा टोमणा पाहून अश्विन भडकला आणि त्यानंही ट्विटरवरून गिब्सला सुनावलं. तुझ्यापेक्षा जोरात नाही. मी तुझ्याएवढा प्रतिभावान नाही. पण नैतिकतेच्या दृष्टीनं माझं डोकं ठिकाणावर आहे. मी मॅच फिक्सिंग केलेली नाही, असं ट्विट अश्विननं केलं.
या ट्विटवरून वाद वाढल्यावर अखेर अश्विननं ते ट्विट डिलीट केलं. गिब्सनंही यानंतर ट्विट करून वादावर पडदा टाकला. तू मस्करी योग्य पद्धतीनं स्वीकारत नाहीस, असं ट्विट गिब्सनं केलं.
यानंतर अश्विननंही त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. माझी प्रतिक्रियाही एक विनोदच होता. पण तू आणि बाकीच्यांनी त्याचा अर्थ काय काढला? अशा मस्करीसाठी मी नेहमीच तयार असतो. कधीतरी रात्री जेवायला भेटू आणि याबद्दल बोलू, असं अश्विन म्हणाला.
२००० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगमुळे वादळ आलं होतं. मॅच फिक्सिंगमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची नावं समोर आली होती. यामध्ये हर्षल गिब्सच्या नावाचाही समावेश होता.