इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा
येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : आशिया कपमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला यश मिळालं. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो म्हणजे रवींद्र जडेजा. विरोधी संघाचे चार गडी बाद करत सामनावीर म्हणूनही त्याला गौरवण्यात आलं. यावेळी जडेजाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. या सामन्यानंतर त्याचं कौतुक झालं खरं आणि खऱ्या अर्थाने इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नसल्याचंच म्हणत त्याने टीकाकारांना उत्तर दिलं.
बांगलादेशविरोधातील सामन्यात भारतीय संघाच्या वाट्याला आलेल्या विजयात जडेजाच्या गोलंदाजीची महत्त्वाची कामगिरी पाहायला मिळाली.
२९ धावा देत चार फलंदाजांचा तंबूत परत पाठवत त्याने ही कमाल केली आणि खऱ्या अर्थाने भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघात पुनरागमनाचा दणका दाखवून दिला.
माध्यमांशी संवाद साधत आपल्या या कामगिरीविषयी सांगत तो म्हणाला, 'मला हा क्षण कायम स्मरणात राहील. कारण मी तब्बल ४८० दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय एकदिवसीय संघात परतलो आहे. याआधी मी कधीच इतका जास्त काळ संघातून बाहेर नव्हतो. इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची आपल्याला गरज वाटत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. ज्या गोष्टी मला येतात त्यावरच अधिक मेहनत घेण्याची गरज आहे', असं म्हणत स्वत:लाच आव्हान देण्याला आपण प्राधान्य देत असल्याचं सांगत त्याने आपली भूमिका मांडली. जडेजाने त्याच्या या वक्तव्यातून आणि एकंदरच कामगिरीतून भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचं लक्ष वेधलं आहे, असं म्हणावं लागेल.
२०१९ मध्ये येऊ घातलेल्या विश्वचषकाविषयी बोलतेवेळी त्यासाठी बराच वेळ असल्याचंही तो म्हणला. फिरकी गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रवींद्रने येत्या काळात आपल्या खेळावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही स्पष्ट केलं. त्यामुळे आता येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.