भारताचा पाकिस्तानमध्ये खेळायला नकार, या देशात होणार आशिया कप
२०२० सालचा आशिया कप पाकिस्तानमधून हलवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार झालं आहे.
मुंबई : २०२० सालचा आशिया कप पाकिस्तानमधून हलवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार झालं आहे. पाकिस्तानऐवजी ही स्पर्धा आता युएईमध्ये होणार आहे, अशी माहिती आहे. याआधी भारताने पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा खेळायला नकार दिल्यामुळे ही स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवली जाईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. आशिया कपचा वाद मिटला आहे. एका त्रयस्त ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाईल. हे ठिकाण आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत ठरवलं जाईल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
यंदाच्या आशिया कप हा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपआधी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. याआधी २०१८ सालीही युएईमध्येच आशिया कप खेळवला गेला होता. २०१८ सालचा आशिया कप भारतात होणं अपेक्षित होतं, पण पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिजाची समस्या निर्माण झाल्यामुळे, बीसीसीआयने ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित केली.
आशिया कपचं ठिकाण हे तटस्थ असलं पाहिजे. यावेळी पाकिस्तानमध्ये जाणं हा पर्याय नाही. भारतीय टीम पाकिस्तानचा दौरा करणार नाही. जर आशिया क्रिकेट परिषदेला भारताशिवाय ही स्पर्धा खेळवायची असेल, तर ते तसं करु शकतात. पण जर भारताला घेऊन स्पर्धेचं आयोजन करायचं असेल, तर मात्र ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होता कामा नये, असा इशारा बीसीसीआयने दिला होता.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये आशिया कप होणार होता, पण भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला. भारत जर पाकिस्तानमध्ये खेळत नसेल, तर आम्हीही २०२१ साली भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी प्रमुख वसीम खान म्हणाले होते. वसीम या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर वसीम खान यांनी पलटी मारली. माझ्या वक्तव्य चुकीच्या संदर्भाने दाखवण्यात आलं अशी सारवासारव वसीम खान यांनी केली.
२०२१ साली भारतामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक समी उल हसन बर्नी यांना विचारण्यात आला आहे. आम्हाला निमंत्रण मिळालं, व्हिजा मिळाला आणि सुरक्षा देण्यात आली, तर आम्ही भारतामध्ये जायला तयार आहोत, असं उत्तर त्यांनी दिलं. ज्यापद्धतीने आम्ही २०११च्या वर्ल्ड कपमध्ये आणि २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतात गेलो होतो, तसंच २०२१ सालीही जाऊ, असं स्पष्टीकरण बर्नी यांनी दिलं.
२००९ साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १० वर्ष कोणतीही टीम पाकिस्तानला गेली नव्हती. अखेर २०१९ साली श्रीलंकेच्या टीमने पाकिस्तानचा दौरा केला होता. यानंतर जानेवारी महिन्यात बांगलादेशची टीमही पाकिस्तानमध्ये गेली.
दोन्ही देशांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळतात.