Asia Cup 2022 च्या सुंदर ट्रॉफीचे अबुधाबीमध्ये अनावरण, पहिला फोटो आला समोर
आशिया कप 2022 स्पर्धा काही दिवसांवर आली आहे. या स्पर्धेची ट्रॉफीचा पहिला फोटो समोर आला आहे.
Asia Cup 2022 : आशिया कप 2022 सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही मोठी स्पर्धा होत आहे. जी आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. सलग दुसऱ्यांदा यूएईमध्ये होणारी ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. यासाठी स्पर्धेतील पाच प्रमुख संघांनीही आपले संघ जाहीर केले आहेत. युएई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेख नाह्यान मुबारक अल नाह्यान यांच्या हस्ते शुक्रवारी अबुधाबीमध्ये या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
श्रीलंकेने देशाच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा हवाला देऊन स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर यूएईला स्पर्धेचे यजमानपद सोपवण्यात आले. अशा परिस्थितीत दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये अंतिम सामन्यासह एकूण नऊ सामने होणार आहेत. तर शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये चार सामने होणार आहेत. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
भारत-पाकिस्तान संघ एकच गटात
आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय संघ हा गतविजेता आहे आणि आपला दबदबा कायम ठेवण्याचा त्यांचा यंदाही प्रयत्न असेल. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर यावेळी सहा संघ सहभागी होणार असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत, तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान ब गटात आहेत. तर तिसरा संघ (सिंगापूर, हाँगकाँग, कुवेत आणि यूएई) क्वालिफायर स्पर्धेद्वारे निश्चित केला जाईल. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील सर्व संघांविरुद्ध सामना खेळेल आणि त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 फेरीत प्रवेश करतील.
आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.