दुबई : अफगाणिस्तानने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध आशिया कप टी-20 स्पर्धेच्या मुख्य लीगच्या सलामीच्या सामन्यात श्रीलंकेच्या टीमवर 8 विकेट्सने विजय मिळवला. विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी आनंदात दिसून आला. या यशामुळे टीमचं मनोबल खूप उंचावेल, असं त्याचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 19.4 ओव्हरमध्ये 105 रन्सवर गुंडाळल्यानंतर अवघ्या 10.1 ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामनावीर फझलहक फारुकीने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं. यानंतर श्रीलंकेची टीम सावरू शकला नाही आणि पत्त्यांप्रमाणे गडगडत गेली. 


सामन्यानंतर गोलंदाजांचं कौतुक करताना नबी म्हणाला, आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, विशेषत: वेगवान गोलंदाज फारुकी याने. प्रथम गोलंदाजी करण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. आम्ही सामन्यापूर्वी नियोजन केलं होतं आणि योजनेनुसार गोलंदाजी करण्याचाही फायदा झाला.


नबी पुढे म्हणाला, ''आमच्या गोलंदाजांना स्विंग मिळत असेल तर आम्हाला आक्रमक गोलंदाजी करायला आवडते. सलामीवीरांनी आत्मविश्वासाने फलंदाजी करत संघाचे काम सोपं केलं. या यशाने मनोबल उंचावलं असून येणाऱ्या आगामी सामन्यांमध्ये आम्ही अजून चांगली कामगिरी करू.


दरम्यान श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका म्हणाला की, टीमला पुढील सामन्यात मोठा विजय नोंदवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. बॅटिंग युनिट म्हणून, आम्हाला खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार खेळावं लागेल. पीचवर गवत होतं आणि आमच्या फिरकीपटूंनी मदत झाली नाही. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही काही वाईट शॉट्सही खेळले.