मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी माजी कर्णधार विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर वक्तव्य केलंय.. गांगुली यांच्या म्हणण्याप्रमाणे, धडपडणारा फलंदाज विराट कोहलीने केवळ भारतासाठीच नाही तर स्वत:साठीही रन्स करणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन अंकी खेळ करता आला नाही. शनिवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याला पुन्हा जुनी लय मिळवण्यासाठी विराटला प्रयत्न करावा लागणार आहे.


कोहलीसंदर्भात बोलताना गांगुली म्हणाले, “त्याला केवळ भारतासाठीच नव्हे तर स्वतःसाठी धावा करण्याची गरज आहे. आशा आहे की तो त्याच्यासाठी चांगला सिझन असेल. तो पुन्हा लयीत येईल यावर आम्हा सर्वांना विश्वास आहे. मला खात्री आहे की जसं आपण सर्वजण त्याच्या शतकाची वाट पाहत आहोत, तो त्याच्यासाठी तितकीच मेहनत करतोय."


गांगुली पुढे म्हणाले, "टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे वेळ कमी असतो, त्यामुळे शतक झळकावण्याची शक्यता कमी होते पण आशा आहे की कोहलीसाठी हा सिझन यशस्वी होईल."


कोहली जून-जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर एका महिन्याच्या सुट्टीवर होता. भारतीय टीमने या काळात वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या आहेत. कोहलीची गेल्या पाच डावांतील सर्वोच्च धावसंख्या 20 आहे, जी त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केली होती.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडल्यानंतर, इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सिझनमध्येही त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आयपीएलच्या या सिझनमध्ये त्याने 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीने 341 रन्स केले.