IND vs PAK : किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं, पाकिस्तानी खेळाडूला दिली `ही` अमूल्य भेट... Video
चुरशीच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या खिलाडीवृत्तीने जिंकली चाहत्यांची मनं
Asia Cup 2022 : टीम इंडियाने (Team India) मिशन 'एशिया कप 2022' ची दमदार सुरुवात केली आहे. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Dubai International Stadium) खेळल्या गेलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 विकेटने धुळ चारली. पाकिस्तानने (Pakistan) भारतासमोर विजयासाठी 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाने हे आव्हान 2 चेंडू आणि 5 विकेट राखून पार केलं. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो हार्दिक पांड्या (Hardik Pandya).
मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठी चुरस असली तरी सामन्यानंतर या दोनही संघाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या खिलाडीवृत्तीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. याचं उदाहरण दिसलं ते किंग कोहली अर्थात विराट कोहलीच्या एका कृतीने.
किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं
सामन्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने (Haris Rauf) भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) भेट घेतली. अगदी हलक्या-फुलक्या वातावरणात या दोघांमध्ये गप्पा रंगल्या. यावेळी विराट कोहलीने रौफला आपली जर्सी भेट म्हणून दिली. या जर्सीवर विराटने ऑटोग्राफही दिला. बीसीसीआयने (BCCI) याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
श्रीलंकन फॅनची घेतली भेट
पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माने एका श्रीलंकन फॅनची आवर्जुन भेट घेतली. सेनानायक असं या फॅनचं नाव असून श्रीलंका संघाचा तो सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी
एशिया कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना होता पाकिस्तानशी. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 19.5 ओव्हरमध्ये 147 धावांमध्ये गडगडला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या.
विराट कोहलीची महत्त्वपूर्ण खेळी
गेल्या काही सामन्यात सूर हरवलेल्या विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये केएल राहुल बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीने अतिशय संयमी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. विराट कोहलीने 35 धावा केल्या. आता उर्वरित स्पर्धेतही विराटकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.