Asia Cup 2022: एशिया कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय, हा खेळाडू पोहोचला थेट दुबईला
एशिया कप स्पर्धेआधी हा वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिरात दाखल
Asia Cup 2022 : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियांच (Team India) 'मिशन एशिया कप' (Asia Cup 2022) 28 ऑगस्टपासून सुरु होतंय. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना खेळवला जाणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्सचा (RR) वेगवाग गोलंदाज कुलदीप सेन (Kuldip Sen) नेट बॉलर म्हणून भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) सराव शिबिरात दाखल झाला आहे. बीसीसीआयने दीपक चाहरच्या (Deepak Chahar) दुखापतीच्या वृत्ताचंही खंडन केलं आहे. दीपक चाहर भारतीय संघासोबतच असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
कुलदीप सेनची कारकिर्द
कुलदीप सेन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघाकडून खेळतो. 2022 च्या आयपीएल हंगामात 20 लाखांच्या बेस प्राईजवर राजस्थानने कुलदीप सेनला संघात घेतलं. कुलदीप सेनचा जन्म मध्य प्रदेशाच्या रीवा जिल्ह्यात झाला. राज्यस्तरीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कुलदीप सेनने दमदार कामगिरी केली आहे.
2018 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण
कुलदीप सेनचे वडिल सलून चालवतात. पाच भाऊ-बहिणींमध्ये कुलदीप हे तिसरं आपत्य. कुलदीपला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. कुलदीपची क्रिकेटची आवड आणि त्याची जिद्द पाहून क्रिकेट अकॅडमीने त्याची फी माफ केली होती. 2018 मध्ये कुलदीपने रणजी कप स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
पदार्पणातच कुलदीपने पंजाब संघाविरुद्ध एकाच इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची करामत केली. तसंच संपूर्ण स्पर्धेत त्याने 25 विकेट घेतल्या. 25 वर्षांच्या कुलदीपने 16 प्रथम श्रेणी सामन्यात आतापर्यंत 44 विकेट घेतल्या आहेत.
एशिया कप स्पर्धेत 6 संघ सहभागी
युएईमध्ये 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान रंगणाऱ्या एशिाय कप स्पर्धेत 6 संघांचा समावेश आहे. यात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तर क्वालिफाईंग राऊंडमधून सहावी टीम म्हणून हाँगकाँगने धडक मारली आहे.