21 धावांत 6 विकेट्स घेणाऱ्या सिराजसाठी दिल्ली पोलिसांचं खास गिफ्ट! म्हणाले, `सिराजला...`
Delhi Police On Mohammed Siraj: मोहम्मद सिराजने पहिल्या 16 चेंडूंमध्येच 5 श्रीलंकन खेळाडूंना तंबूत पाठवलं. सिराजने एकूण 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांमध्ये बाद झाला.
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. याच कामगिरीमुळे लंकेचा संपूर्ण संघ फक्त 50 धावांवर तंबूत परतला. भारतीय फलंदाजांनी 51 धावांचं औपचारिक लक्ष्य एकही गडी न गमावता 37 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. या विजयासहीत भारताने 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच आणि एकूण आठवड्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं.
दिल्ली पोलिसांनाही मोह आवरला नाही
भारताने 263 चेंडू बाकी असतानाच विजय मिळवला. भारताने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या विजयानंतर मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच या 29 वर्षीय खेळाडूचं दिल्ली पोलिसांनाही कौतुक केलं आहे. दिल्ली पोलिसांच्या सोशल मीडिया टीमलाही सिराजचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन मोहम्मद सिराजला विशेष सूट देत असल्याची पोस्ट केली आहे.
नक्की वाचा >> संजू नाराज! त्याची Insta पोस्ट पाहून चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सकडून खेळत असता तर...'
दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?
दिल्ली पोलिसांच्या अकाऊंटवरुन #AsiaCupFinals, #AsiaCup2023, #INDvsSL या हॅशटॅगसहीत पोस्ट करण्यात आली आहे. 'आज वेगासाठी मोहम्मद सिराजचं कोणतंही चलान कापलं जाणार नाही,' अशी पोस्ट दिल्ली पोलिसांनी केली. रविवारच्या सामन्यानंतरच दिल्ली पोलिसांनी ही पोस्ट केली होती. दिल्ली पोलिसांनी सवलत देत दिलेलं हे खास गिफ्ट फारच उत्तम असल्याचं अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या क्रिएटीव्हीटीचं कौतुक
अनेकांनी दिल्ली पोलिसांच्या या अनोख्या क्रिएटीव्हीटीचं कौतुक केलं आहे. काहींनी क्रिएटीव्हीटीमध्ये तुम्ही मुंबई पोलिसांनाही मागे टाकल्याचं म्हटलं आहे.
अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले
मोहम्मद सिराजने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले. आशिया चषक स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेल्या सर्वोच्च कामगिरीच्या यादीत सिराजची कामगिरी ही दुसऱ्या स्थानी आहे. अजंता मेंडिसने 2008 च्या अंतिम सामन्यामध्ये 16 धावांमध्ये भारताचे 6 गडी बाद केले होते. मोहम्मद सिराजने आपल्या नावावर 5 विकेट्स नोंदवण्यासाठी केवळ 16 चेंडू टाकले.
नक्की वाचा >> 0,5,0,0,1,0,0,0,3,0,1... फोन नंबर नाही स्कोअरकार्ड; संपूर्ण टीम 15 धावांवर ऑल आऊट
16 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेणे हा सुद्धा एक विक्रम असून यापूर्वी 2003 साली श्रीलंकेच्या चामिंडा वासने 16 चेंडूंमध्ये 5 गडी बाद केले होते. ही कामगिरी त्याने बांगलादेशविरुद्ध केली होती. अमेरिकेच्या अली खाननेही 16 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या.