0,5,0,0,1,0,0,0,3,0,1... फोन नंबर नाही स्कोअरकार्ड; संपूर्ण टीम 15 धावांवर ऑल आऊट

Team All Out On 15 Runs: हा संघ 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 10 ओव्हर्समध्येच तंबूत परतल्याचं पहायला मिळालं. विरोधकांनी सामना 162 धावांनी जिंकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 20, 2023, 10:02 AM IST
0,5,0,0,1,0,0,0,3,0,1... फोन नंबर नाही स्कोअरकार्ड; संपूर्ण टीम 15 धावांवर ऑल आऊट title=
या सामन्याचा स्कोअरकार्ड पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Team All Out On 15 Runs: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकन संघ अवघ्या 50 धावांवर बाद झाला. भारताने अंतिम सामना आणि आशिया चषक जिंकण्याचं आपलं स्वप्न अवघ्या 6.1 षटकांमध्ये पूर्ण केलं. भारताने 8 व्यांदा आशिया चषक जिंकला. तर दुसरीकडे श्रीलंकन संघाने आशिया चषक स्पर्धेमधील सर्वात कमी धावसंख्या नावावर नोंदवण्याचा नकोसा विक्रम केला. मात्र रविवारी झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी एक संघ चक्क 15 धावांवर बाद झाला आहे. टी-20 सामन्यामध्ये एक राष्ट्रीय संघ केवळ 15 धावा करुन तंबूत परतला. 

टॉस जिंकला पण

मंगोलिया आणि इंडोनेशियादरम्यान झालेल्या टी-20 सामन्यामध्ये हा अजब प्रकार घडला. सामन्यानंतर मंगोलियन कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. इंडोनेशियाने भन्नाट फलंदाजी करत 187 धावा केल्या. केवळ 4 गड्यांच्या मोबदल्यात एवढी धावसंख्या इंडोनेशियाने केली. इंडोनेशियाच्या महिला संघाने 20 षटकांमध्ये 187 धावांपर्यंत मजल मारली. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मंगोलियन महिला संघातील एकाही खेळाडूला 2 आकडी धावसंख्या करता आली नाही.

7 खेळाडू भोपळा न फोडता तंबूत परतले

आश्चर्याची बाब म्हणजे 11 पैकी 7 खेळाडू भोपळा न फोडता बाद झाले. इंडोनेशियाच्या अॅण्डरिनाई अॅण्डरिनाईने 4 खेळाडूंना बाद केलं. 4 ओव्हरमध्ये तिने केवळ 8 धावांच्या मोबदल्यात 4 खेळाडूंना बाद केलं. मंगोलियाच्या सर्व खेळाडूंचा एकत्र मिळून साध्या 20 धावाही करता आल्या नाहीत. हँगजोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई खेळ 2022 च्या स्पर्धेअंतर्गत हा सामना खेळवला गेला. विशेष म्हणजे सर्वात कमी धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम अवघ्या 15 धावांवर बाद झाल्यानंतरही मोडलेला नाही. 

8 वर 5 बाद 

188 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंडोनेशियन संघाची सुरुवातच फार वाईट झाली. संघाची धावसंख्या 8 वर असताना अर्धा संघ तंबूत परतला. 10 व्या ओव्हरमध्ये संपूर्ण संघ 15 धावांवर बाद झाला. पहिल्यांदाच मंगोलियन संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असल्याने अशी कामगिरी निराशाजनक आहे. खाली पाहा मंगोलियन संघाचं स्कोअरकार्ड...

सर्वात लो स्कोअरिंग सामना कोणता? जिथं अवघ्या 2 चेंडूंमध्ये गाठलं टार्गेट

इसेल्स ऑफ मॅन आणि स्पेनदरम्यान 26 फेब्रुवारी 2023 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली होती. अवघ्या 10 धावांवर इसेल्स ऑफ मॅनचा संघ बाद झाला होता. केवळ 8.4 ओव्हरमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला. या संघाचे 7 फलंदाज शुन्यावर बाद झाले होते. स्पेनने एका नो बॉलमुळे अवघ्या 2 चेंडूंमध्ये हा सामना जिंकला होता.