आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तानचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आणि स्पर्धेतून बाहेर पडले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला. यानंतर आता भारत आणि श्रीलंकेत अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू रमीज राजा यांनी श्रीलंकेविरोधातील पराभवासाठी भारताला जबाबदार धरलं आहे. भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करत मोठा मानसिक धक्का दिला. यामुळेच श्रीलंकेविरोधातील सामन्यातही संघ चांगली कामगिरी करु शकला नाही असा त्यांचा दावा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि श्रीलंकेमधील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पावसानंतर सामना सुरु झाला असताना पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 42 ओव्हर्समध्ये 252 धावा ठोकल्या. डीएलएस नियमांतर्गत श्रीलंकेलाही 252 धावांचंच लक्ष्य देण्यात आलं होते. यानंतर श्रीलंकेने दमदार सुरुवात केली होती. पण 91 धावा ठोकल्यानंतर कुसल मेंडिस बाद झाला आणि नंतर विकेट्सची रांगच लागली. 


समरविक्रमाने 48 धावा केल्या आणि तोही बाद झाला. यानंतर असलंकाने एका बाजूने लढा दिला. पण श्रीलंकेने 210 ते 246 धावांदरम्यान अचानक 5 विकेट गमावल्या. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती. जमान खान गोलंदाजी करत होता, तर असलंका आणि प्रमोद मैदानात होते. चौथ्या चेंडूवर प्रमोद आऊट झाल्यावर पाकिस्तानला विजयाची आशा दिसत होती. पण शेवटच्या दोन चेंडूंत असलंकाने प्रथम एक चौकार आणि नंतर आवश्यक असलेल्या 2 धावा काढत या रोमांचकारी सामन्यात विजय मिळवून दिला. 


आशिया कपच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. याचं कारण आशिया कपमध्ये नेहमीच दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ हे आकर्षण राहिलं आहेत. आतापर्यंत 15 वेळा दोन संघ आमने-सामने आले आहेत. पण श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास संपला आणि ते बाहेर पडले. यासह भारत-पाकिस्तान सामन्याची आशा असलेल्या क्रिकेटरसिकांचीही निराशा झाली. 


दरम्यान याआधी पाकिस्ताविरोधात झालेल्या सामन्यात भारताने तब्बल 228 धावांनी त्यांचा दणदणीत पराभव केला होता. भारताने 357 धावांचं टार्गेट दिलं असताना, पाकिस्तान संघ 128 धावांतच गुंडाळळा. या सामन्यात कुलदीप यादवने एकूण 5 विकेट्स घेतले. 


रमीज राजा यांन युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आणि मानसिक खच्चीकरण झालं. त्यांची हीच मानसिक स्थिती श्रीलंकेविरोधातील सामन्यात कायम राहिली. 


"भारताविरोधात झालेल्या दणदणीत पराभवाने पाकिस्तानला खूप मोठा मानसिक धक्का दिला. हा धक्का ते पचवू शकले नाहीत आणि श्रीलंकेविरोधातील सामन्यात तसेच खेळले असं दिसत आहे. ते मैदानात घाबरलेले दिसत होते आणि सामना व्यवस्थित संपवण्यात अयशस्वी ठरले. बाबर आझम आणि आघाडीचे फलंदाज जास्त सावध दिसत होते. त्यांच्याकडे अधिकारवाणी दिसत नव्हती," असं रमीज राजा यांनी म्हटलं आहे.


यावेळी रमीज राजाने फखर जमन आणि बाबर आझमच्या नेतृत्वावरही टीका केली. "फखर जमन हा आता नेहमी विकेट गमावताना दिसतो. त्याची देहबोली धक्कादायक आहे. मला वाटतं फखरनेच आता खेळण्यास नकार दिला पाहिजे. धीम्या खेळपट्टीवर बाबरला संघर्ष करावा लागत आहे. त्याने आता कर्णधार म्हणूनही पुढे आलं पाहिजे. त्याने अधिकाराने निर्णय घ्यायला हवे," असं ते म्हणाले.