Asia Cup 2023 Ind vs SL Points Table: श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील 'सुपर-4' फेरीमध्ये भारताने सोमवारी झालेल्या सामन्यात राखीव दिवशी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. भारताने पाकिस्तानी संघाला 228 धावांनी धूळ चारली. भारताने प्रथम फलंदाजी करत 356 धावांचा डोंगर उभा केला. या एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ढेपाळला. पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला विराट कोहलीने केलेल्या 122 धावांपेक्षा केवळ 6 धावा अधिक करता आल्या आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ 128 धावांवर तंबूत परतला. भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. भारत सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी असून आज म्हणजेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर 15 तासांच्या आत पुन्हा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाच्या या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच हा सामना होणार असून हा सामना जिंकल्यास भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...


भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सुपर-4' फेरीमधील भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतरच्या पॉइण्ट्स टेबलवर नजर टाकली तर भारत अव्वल स्थानी दिसत आहे. 'सुपर-4' फेरीमध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. भारताचा आतापर्यंत केवळ एक सामना झाला असून आज दुसरा सामना भारत श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. तर तिसरा सामना 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारताने 238 धावांनी पाकिस्तानला पराभूत केल्याने भारताला नेट रन रेटमध्ये फायदा झाला आहे. भारताचं नेट रन रेट हे +4.560 इतकं आहे. तर भारताविरुद्धच्या सामन्याआधी पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेले पाकिस्तान थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानने सामने खेळले असून पहिल्या सामन्यात त्यांनी बांगलादेशवर मोठा विजय मिळवला होता. मात्र भारताकडून दारुण पराभूत झाल्याने पाकिस्तानलाही आता अंतिम सामना गाठण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. बांगलादेशचा श्रीलंकेने आणि पाकिस्ताननेही पराभव केल्याने ते अंतिम फेरीच्या शर्यतीमधून बाहेर आहेत. तर श्रीलंका दुसऱ्या स्थानी आहे. श्रालंकेने 2 सामने खेळले असून एक सामना त्यांनी जिंकला आहे. तर एक गमावला आहे. 



...तर थेट भारत आणि श्रीलंका फायनलमध्ये भिडणार


आता कोलंबोमधील पाऊस पाहिल्यास एकही सामना झाला नाही तर सर्व संघांना एक एक गुण वाटून दिला जाईल. स्पर्धेमधील साखळी फेरीतील सर्व सामने प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. या ठिकाणी पुढील आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच आजच्या भारत श्रीलंका सामन्याबरोबरच अन्य 2 सामनेही पावसामुळे वाहून गेल्यास कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने गुण वाटून देण्याशिवाय पर्याय नाही. गुण वाटून दिल्यास त्याला नेट रन रेटवर परिणाम होत नाही. त्यामुळेच आता आहे त्या स्थितीमध्ये सर्व सामने रद्द झाले तर भारत आणि श्रीलंकेमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. 


'सुपर-4' फेरीत उरलेले सामना


भारत विरुद्ध श्रीलंका - 12 सप्टेंबर, दुपारी 3 वाजल्यापासून प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - 14 सप्टेंबर, दुपारी 3 वाजल्यापासून प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
भारत विरुद्ध बांगलादेश - 15 सप्टेंबर, दुपारी 3 वाजल्यापासून प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
फायनल सामना - 17 सप्टेंबर, दुपारी 3 वाजल्यापासून प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो