Asia Cup 2023, India vs Bangladesh : भारतीय संघानं आशिया चषकाच्या अंतिम फेरीत अतिशय सहजपणे धडक मारली आणि आता हा संघ Final Match साठी सज्ज होत असतानाच खेळाडूंच्या आत्मविश्वासाला धक्का लागला. कारण, अंतिम सामन्यापूर्वीच Team India ला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अर्थात या पराभवाचा संघाला फारसा फटका बसला नसला तरीही त्यांचा सुमार खेळ पाहून क्रिकेटप्रेमींनी मात्र निराशा व्यक्त केली. या साऱ्यामध्ये अनेकांनी एका खेळाडूवर पराभवाचं खापरही फोडलं. 


सामन्यात नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेल्या भारतीय संघापुढं बांगलादेशनं विजयासाठी 266 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण, संघातील खेळाडू 49.5 षटकांमध्ये 259 धावाच करु शकले. जिथं खेळाडूंना क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. त्यामुळं अंतिम सामन्यात तरी हे चांगले खेळणार ना? असाच निराशाजनक प्रश्न क्रिकेटप्रेमींनी उपस्थित केले आहेत. 


राहिला प्रश्न क्रिकेट सामन्यात नेमकं काय घडलं याबाबतचा? तर, शुक्रवारी कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशनं सुपर 4 सामन्यामध्ये भारतीय संघाचा 6 धावांनी पराभव केला. रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव अशा खेळाडूंचा सहभाग असतानाही संघाला 266 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही. शुभमन गिलनं या सामन्यात शतकी खेळी पूर्ण केली पण, त्याच्या 121 धावा संघाला जिंकवू शकल्या नाहीत. 


संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित शर्मा शून्यावरच बाद झाला. ज्यानंतर मागोमागच आलेल्या तिलक वर्मानंही प्रभावी खेळी केली नाही. अवघ्या 5 धावा करून तोसुद्धा तंबूत परतला. ज्यानंतर पाचव्या स्थानावर आलेल्या ईशान किशनकडून क्रिकेटप्रेमींच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. पण, त्यानंही 5 धावा करत सर्वांनाच निराश केलं. सध्या ईशान संघात फलंदाज म्हणून खेळत असून, Wicket Keeping ची जबाबदारी केएल राहुलकडे आहे. 


हेसुद्धा वाचा : Asia Cup 2023 : पावसामुळे फायनल सामना रद्द झाला तर...; 'या' टीमला सोपवली जाणार ट्रॉफी


 


आता महत्त्वाचा मुद्दा असा, की आशिया चषकातील अंतिम सामन्यासाठीच्या प्लेइंग 11 मध्ये ईशानची वर्णी लागते की त्याच्याऐवजी संघात श्रेयस अय्यरचीच निवड होते. अय्यर सध्या सामन्यासाठी पूर्णपणे फिट नसल्याची माहितीसुद्दा समोर येत आहे. त्यामुळं आता संघात चौथ्या आणि पाचव्या स्थानासाठी नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरण्यासोबतच सुमार कामगिरी करणाऱ्या ईशान किनशचा पत्ता कट होतो का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.